ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी निराशाजनक सुरूवात झाल्यानंतरही भारतीय संघाने पुनरागमन करत बॉर्डर-गावस्कर करंडक २-१ असा जिंकला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही धूळ चारून कसोटी क्रमवारीतील आपले नंबर एकचे स्थान कायम ठेवले. भारतीय संघाने लागोपाठ सात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम देखील केला. धरमशाला कसोटीत विराट कोहली संघात नसतानाही भारतीय खेळाडूंनी न खचता ऑस्ट्रेलियावर मात करून कसोटी विश्वातील आपली ‘दादागिरी’ दाखवून दिली. सामना जिंकल्यानंतर पारितोषिक वितरणावेळी कोहलीने संघ सहकाऱयांवर कौतुकाच वर्षाव केला.

कसोटी मालिकांमधील प्रत्येक सामना आमच्यासाठी एक नवं आव्हान ठरणारा होता. अगदी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून अगदी बांगलादेशविरुद्धच्या कसोटीपर्यंतचा काळ अवर्णनीय आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने आव्हानात्मक होते. पण या मालिकेत ज्यापद्धतीने आम्ही प्रत्युत्तर दिले ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. खडतर आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवल्यामुळे आम्हाला आमच्या क्षमतेतही कमालीची वाढ करता आली. कसोटी क्रमवारीत अवघ्या दोन वर्षात सातव्या स्थानावरून अव्वल स्थानावर संघाने झटपट झेप घेतली. क्रमवारीत नंबर एकचा संघ म्हणून या हंगामाचा शेवट होईल असं वाटलं नव्हतं. जेव्हा सुरूवात केली तेव्हा आपण कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठू असंही कधी वाटलं नव्हतं, असे कोहलीने सांगितले.

 

गेल्या सात कसोटी मालिकांमधील सर्वात आव्हानात्मक मालिकेबाबात विचारण्यात आले असता कोहली म्हणाला की, ”श्रीलंका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक होती. संघातील प्रत्येक खेळाडूने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिका विजय सर्वोत्तम होता. इंग्लंडविरुद्धची मालिकाही महत्त्वाची होती, पण ऑस्ट्रेलियाने ज्यापद्धतीने झुंज दिली ते पाहता ही मालिका अप्रतिम होती. संघातील प्रत्येकाने आपली योग्यता आणि परिपक्वता सिद्ध करून दाखवली.”

कोहलीने यावेळी वेगवान गोलंदाजांचेही कौतुक केले. संघातील वेगवान गोलंदाजांनी ज्यापद्धतीने आपली फिटनेस दाखवून दिली ती कौतुकास पात्र आहे. फिटनेसवर भर दिल्यानंतर वेगवान गोलंदाजीत खूप बदल झाल्याचे आम्हाला दिसून आले. अचूक टप्प्यात गोलंदाजीचा अनुभव आम्हाला मैदानात घेता आला. उमेश आणि शमीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, असे कोहली म्हणाला.