सुनील गावस्कर यांची सूचना

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताच्या पराभवाची लक्षणे दिसताच कटकच्या बाराबती स्टेडियमवर क्रिकेटरसिकांनी केलेल्या हुल्लडबाजीविषयी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली. पुढील दोन वष्रे कटकला आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येऊ नये, अशी सूचना गावस्कर यांनी केली आहे.

भारतीय संघाला ९२ धावांत गुंडाळल्यानंतर सहा विकेट्स राखून दक्षिण आफ्रिकेने दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकला. भारताच्या पराभवाची चिन्हे दिसताच प्रेक्षकांनी मैदानावर बाटल्या फेकून खेळ थांबवला.

‘‘स्टेडियमवरील पोलिसांना कोणतीही कल्पना नव्हती. सीमारेषेपलीकडे उभ्या असलेल्या पोलिसांनी क्रिकेट सामना पाहू नये, तर प्रेक्षकांच्या हालचालींकडे

लक्ष द्यावे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.

‘‘कटक स्टेडियमवर पुढील दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी. याचप्रमाणे बीसीसीआयने ओडिशा क्रिकेट असोसिएशनला निधी देणे थांबवावे,’’ असे गावस्कर म्हणाले. संघाची कामगिरी खालावली म्हणून मैदानावर वस्तू टाकून खेळात व्यत्यय आणण्याचा प्रेक्षकांना कोणताही अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले.

‘‘संघाची कामगिरी उत्तम झाली म्हणून प्रेक्षक मौल्यवान वस्तू मैदानावर टाकतील का? त्यामुळे संघाची कामगिरी खराब झाल्यास कोणत्याही वस्तू मैदानावर टाकण्याचा प्रेक्षकांना अधिकार नाही,’’ असे उद्गार गावस्कर यांनी काढले.

‘‘भारतीय संघाने गाफील राहू नये, हाच मी त्यांना सल्ला देणे पसंत करीन. कामगिरी उंचावण्यासाठी संघर्ष करावा लागेल. अक्षर पटेल विश्वास सार्थ ठरवत नसेल, तर महेंद्रसिंग धोनीने अमित मिश्राला संधी देऊन पाहावे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.