सायकलिंग क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘टूर डी फ्रान्स’ ही शर्यत उत्तेजकांचे सेवन केल्याशिवाय जिंकणे अशक्य आहे, असे मत महान सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. ‘‘टूर डी फ्रान्स शर्यतीत उत्तेजके घेणारा मी एकमेव सायकलपटू नाही. या शर्यतीत प्रत्येक स्पर्धकाच्या शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. त्यामुळे उत्तेजके घेतल्याशिवाय ही स्पर्धा जिंकणे अशक्य आहे. सायकलिंग शर्यतीत उत्तेजके सर्रास घेतली जातात. मीसुद्धा त्यात सहजपणे सहभागी झालो होतो,’’ असे आर्मस्ट्राँगने सांगितले. आर्मस्ट्राँगने १९९९ ते २००५ दरम्यान सात वेळा ‘टूर डी फ्रान्स’ शर्यतीचे जेतेपद पटकावले. पण त्याची कृष्णकृत्ये गेल्या वर्षी अमेरिकन उत्तेजकविरोधी संस्थेने उघडकीस आणल्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली तसेच त्याच्याकडील जेतेपदे काढून घेण्यात आली.
आर्मस्ट्राँगच्या व्यक्तव्यावर पाच वेळा जेतेपदे पटकावणाऱ्या बर्नार्ड हिनाउल्ट याने नाराजी व्यक्त केली. ‘‘सायकलपटू उत्तेजके घेतात, ही मानसिकता बदलायला हवी. अनेक युवा सायकलपटू उत्तेजक चाचणीत निर्दोष सुटत आहेत. त्यामुळे सायकलपटूंवर चिखलफेक करणे चुकीचे आहे. आर्मस्ट्राँगचे म्हणणे ऐकून मला धक्काच बसला,’’ असे त्यांनी सांगितले.