संयुक्त अरब अमिरातीमधील खेळपट्टय़ा भारतामधील खेळपट्टय़ांसारख्याच असाव्यात व अशा खेळपट्टय़ांवर पुन्हा चमक दाखविण्यासाठी मी उत्सुक आहे, असे सनरायजर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सांगितले.
अबू धाबी येथे १६ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेला प्रारंभ होत आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत दुखापतीमुळे इशांत खेळू शकला नव्हता. त्याविषयी इशांत म्हणाला, ‘‘ती अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा होती. मात्र दुखापतीमुळे मला सहभागी होता आले नाही. आता मात्र मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे व संयुक्त अरब अमिरातीमधील खेळपट्टय़ांवर माझी कामगिरी चांगली होईल अशी मला खात्री आहे. स्थानिक सामन्यांमध्ये मला चांगली लय व टप्पा सापडला होता. त्याचा फायदा मला आयपीएलमध्ये घेता येईल. तेथे योग्य नियोजन करीत मला गोलंदाजी करावी लागणार आहे.’’
‘‘राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याचे प्रत्येक खेळाडूचे ध्येय असते. आयपीएल हे त्यासाठी चांगले व्यासपीठ आहे. या स्पर्धेत सातत्यपूर्ण यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे व त्यामध्ये मी यशस्वी ठरलो तर भारतीय संघाची दारे मला पुन्हा खुली होतील,’’ असे तो म्हणाला.

यंदाच्या हंगामात सनरायजर्स तळपणार -टॉम मूडी
पीटीआय, हैदराबाद
नवीन मालक, नवीन संघ असे असतानाही  सनरायजर्स हैदराबादने सहाव्या हंगामात दिमाखदार कामगिरी करत आपला ठसा उमटवला. गेल्या वर्षी प्ले-ऑफ लढतीपर्यंत मजल मारलेल्या सनरायजर्स यंदा जेतेपदाचा निर्धार व्यक्त केला आहे.
‘‘आमचा संघ संतुलित आहे, गेल्यावर्षी सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे, त्यामुळे यंदा सनरायजर्स जेतेपदासह खऱ्या अर्थाने तळपतील,’’ असा विश्वास संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी संघाच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावणारे शिखर धवन, डेल स्टेन, अमित मिश्रा, करण शर्मा, इशांत शर्मा, डॅरेन सॅमी हे खेळाडू सनरायजर्सनी आपल्या ताफ्यात कायम राखले आहेत. याशिवाय डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच या घणाघाती फलंदाजांचा  संघात समाविष्ट करत संघ मजबूत केला आहे.