कसोटी मालिकेपाठोपाठ वन-डे मालिकाही ५-० अशा फरकाने जिंकत भारतीय संघाने श्रीलंकेचा धुव्वा उडवला. अखेरच्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतलं ३० वं शतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा हातभार उचलला. कसोटी मालिकेप्रमाणे एकाही वन-डे सामन्यात श्रीलंकेच्या संघाने भारतीय संघाला प्रतिकार केला नाही. त्यामुळे वन-डे मालिकाही कमालीची एकतर्फी झाली.

मात्र श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या सामन्यात भारताने विक्रमांचा रतीब घातला. कोलंबोच्या मैदानात भारताने तब्बल १६ विक्रम आपल्या नावे केले आहेत.

० – जसप्रीत बुमराहचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाने ५ सामन्यांच्या वन-डे मालिकेत १५ बळी मिळवले नाहीयेत. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या क्लिंट मॅकाय याच्या नावावर होता. २०१० साली पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत मॅकायने १४ बळी मिळवले होते.

१- प्रतिस्पर्धी संघाला ३ वेळा व्हाईट वॉश देणारा विराट कोहली पहिला कर्णधार ठरलेला आहे. (कमीत कमी ५ सामन्यांच्या मालिकेत)

१- पाहुण्या संघाने यजमान संघाला कसोटी आणि वन-डे सामन्यांमध्ये व्हाईट वॉश देण्याची ही पहिलीच वेळ. (कमीत कमी ३ कसोटी आणि वन-डे सामने)

१- श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानात व्हाईट वॉश देणारा भारत पहिलाच देश ठरला आहे.

१- भारताच्या वन-डे सामन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघामध्ये दोन ‘Wrist Spinners’ ना खेळवण्यात आलं. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांनी भारताच्या ९२२ व्या वन-डे सामन्यात हा कारनामा साधला आहे.

२ – जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या दोन्ही खेळाडूंनी या मालिकेत ५ बळी घेतले. दोन भारतीय गोलंदाजांनी एकाच मालिकेत ५ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ ठरलेली आहे.

३ – सध्या आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारा विराट कोहली तिसरा फलंदाज ठरलाय. कोहलीच्या पुढे एबी डिव्हीलियर्स (७७),महेंद्रसिंह धोनी (७५) हे खेळाडू आहेत. कोहलीने आतापर्यंत ७४ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.

४ – २०१७ या वर्षात विराट कोहलीने वन-डे सामन्यात ४ शतकं झळकावली आहेत.

५ – एका कॅलेंडर वर्षात १००० हून अधिक धावा करण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ.

५ – कोलंबोतल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भुवनेश्वर कुमारने ५ विकेट घेतल्या. ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट मिळवण्याची भुवनेश्वर कुमारची ही पहिलीच वेळ ठरली. या मालिकेत ३ सामने खेळूनही भुवनेश्वरला एकही विकेट मिळवता आली नव्हती. मात्र ही कमतरता त्याने अखेरच्या सामन्यात भरुन काढली.

५ – लागोपाट डावांमध्ये शतक झळकावण्याची विराट कोहलीची ही पाचवी वेळ. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सने हा विक्रम अनेकवेळा केला आहे.

६ – पाच किंवा त्यापेक्षा जास्त वन-डे सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश देण्याची ही भारताची सहावी वेळ. कोहलीने ही किमया ३ वेळा, धोनीने २ वेळा तर गौतम गंभीरने एकदा साधलेली आहे.

८ – श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचं हे आठवं शतक ठरलं. यासोबत विराटने सचिनच्या (८ शतकं) श्रीलंकेविरुद्ध झळकावलेल्या शतकांशी बरोबरी केली. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम अजुनही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. (ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं)

३० – वन-डे कारकिर्दीतलं विराट कोहलीचं हे तिसावं शतक ठरलं. या शतकासोबत विराट कोहलीने रिकी पाँटींगच्या विक्रमाशी बरोबरी केली.

१०० – वन-डे सामन्यांमध्ये सर्वाधिक यष्टीचीत बळींचा संगकाराच्या नावावर असलेला विक्रम महेंद्रसिंह धोनीने कोलंबोच्या मैदानात मोडला. अकिला धनंजयाला यष्टीचीत करुन धोनीने आपल्या नावे शंभरावा यष्टीचीत बळी पक्का केला. संगकाराच्या नावे ९९ बळी आहेत.

१८६ – विराट कोहलीने १८६ डावांमध्ये ३० शतकं झळकावली आहेत. सर्वात कमी डावांमध्ये विराट कोहलीने हा विक्रम केला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने २६७ डावांमध्ये तर रिकी पाँटींगने ३४९ डावांमध्ये ३० शतकं झळकावली होती.