कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडच्या संघातील तीन खेळाडूंकडे एका अनोख्या विक्रमाची नोंद करण्याची संधी चालून आली आहे. एकाच संघातील तब्बल तीन खेळाडूंनी एकाच वर्षात ४० विकेट्स आणि ५०० धावा केल्याचा विक्रम आजवर कोणत्याच संघाने केलेला नाही. पण इंग्लंडच्या सध्याच्या कसोटी संघातील तीन खेळाडूंच्या नावावर हा अनोखा विक्रम नोंदविला जाऊ शकतो. भारतीय संघाविरुद्ध आणखी दोन कसोटी सामने शिल्लक असल्याने इंग्लंडच्या संघातील मोईल अली, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांच्या नावावर एकाच वर्षात ४० विकेट्स आणि पाचशेहून अधिक धावा ठोकण्याच्या विक्रमाची नोंद होऊ शकते.

वाचा: कोहली, धोनी यांना पी.व्ही.सिंधू आणि दिपा कर्माकरने टाकले मागे

मोईन अलीने २०१६ या वर्षात आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये ८३८ धावा केल्या असून ३४ विकेट्स मिळवल्या आहेत. बेन स्टोक्सनेही यंदाच्या वर्षात पाचशेहून अधिक धावा ठोकल्या आहेत. स्टोक्सच्या खात्यात या वर्षात ८२६ धावा जमा आहेत असून ३२ विकेट्स घेतल्या आहेत. ख्रिस वोक्सने २०१६ या वर्षात आतापर्यंत ४८२ धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे पाचशेचा आकडा गाठण्यासाठी वोक्सला केवळ १८ धावांची गरज आहे. वोक्सने ४० विकेट्सचा आकडा याआधीच गाठला आहे, तर मोईन अली याला आणखी ६ विकेट्सची तर स्टोक्सला ८ विकेट्सची गरज आहे. त्यामुळे येत्या दोन कसोटी सामन्यांत इंग्लंडचे हे तीन खेळाडू हा नवा आगळावेगळा विक्रम आपल्या नावावर करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

VIDEO: रिओ ऑलिम्पिकमध्ये पाय तुटलेल्या फ्रान्सच्या ऑलिम्पियनचे ‘कमबॅक’