फ्रान्सचा अनुभवी आघाडीपटू थिएरी हेन्रीने व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दशके फुटबॉलच्या मैदानात अधिराज्य गाजवणारा हेन्री निवृत्तीनंतर इंग्लंडमधील एका खासगी वाहिनीवर फुटबॉल तज्ज्ञ म्हणून काम करणार आहे. ‘‘गेल्या २० वर्षांपासून मी फुटबॉल खेळत असून आता व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा निर्णय मी घेत आहे,’’ असे हेन्रीने ‘फेसबुक’वर म्हटले आहे. फ्रान्सच्या युरोपियन अजिंक्यपद पटकावणाऱ्या संघामध्ये हेन्रीचा समावेश होता, त्याचबरोबर इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अर्सेनल संघाकडून खेळताना सर्वाधिक गोलचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. ‘‘एक खेळाडू म्हणून कारकीर्द घडवल्यावर आता एका वेगळ्या क्षेत्रामध्ये मी पाऊल ठेवणार आहे. लंडनमध्ये परतण्याचा आनंद नक्कीच आहे,’’ असे हेन्रीने सांगितले.