इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब प्रदर्शनामुळे मास्टर-ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सचिनसाठी सक्षम पर्याय मिळेपर्यंत त्याच्या निवृत्तीचा आपण विचार करू शकत नाही, असे मत माजी फलंदाज नवज्योत सिंग सिद्धू यांनी व्यक्त केले.
भारतीय संघ संक्रमणावस्थेत आहे. अशा वेळी सचिनचा अनुभव युवा खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण आणि सौरव गांगुली तिघेही संघाचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत संघाला सचिनची निकडीने गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तेंडुलकरने मागील १० डावांत १५.३ च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत माँटी पानेसरच्या फिरकीसमोर सचिन निष्प्रभ ठरला होता. या पाश्र्वभूमीवर सचिनने निवृत्ती घ्यावी असा सूर माजी खेळाडू आणि तज्ज्ञांनी आळवला होता. मात्र सिद्धू या भूमिकेशी सहमत नाही.
सचिन हा देव नाही. तोही एक माणूस आहे. त्याच्याकडे सुदर्शन चक्रासारखे कोणतेही आयुध नाही. त्याच्याही कारकीर्दीत खराब कालखंड येऊ शकतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. सचिनवर टीका होते तेव्हा वाईट वाटत असल्याचेही सिद्धूने नमूद केले.
सचिन केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून एक विद्यापीठ आहे. तो क्रिकेटविश्वाचा कोहिनूर आहे. कोलकाता आणि नागपूर कसोटीत त्याला निश्चित सूर गवसेल. त्याच्या हालचाली काहीशा मंदावल्या असतील मात्र गेली २३ वर्ष तो अव्याहतपणे क्रिकेट खेळतोय, या दुष्टचक्रातूनही तो बाहेर पडेल, असा विश्वास सिद्धूने व्यक्त केला.