भारताचा ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंगची कुआंतन येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पध्रेत स्वप्नवत वाटचाल सुरू आहे. स्पध्रेत सर्वाधिक दहा गोल त्याच्या नावावर असून हे सर्व गोल त्याने पेनल्टी कॉर्नरवर केले आहेत. पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती मी पार पाडतोय, असे मत रुपिंदरने व्यक्त केले.

जपानविरुद्धच्या पहिल्याच लढतीत रुपिंदरने सहा गोलचा सपाटा लावला, तर पाकिस्तान आणि चीनविरुद्ध त्याने प्रत्येकी एक गोल केला. बुधवारी मलेशियाविरुद्धच्या लढतीत त्याने दोन गोल केले.  उपांत्य फेरीतही गोलधमाका करण्यासाठी आतूर असलेला रुपिंदर म्हणाला, ‘‘ही स्वप्नवत वाटचाल आहे. त्यामुळे मला आनंद झाला आहे. जेव्हा तुम्ही महत्त्वाचा गोल करता, त्या वेळी विशेष आनंद होतो. या संघात माझ्यावर एक भूमिका सोपविण्यात आली आहे आणि पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यासाठी मी संघात आहे.’’

सुरेंदर कुमारवर दोन सामन्यांची बंदी

भारताचा बचावपटू सुरेंदर कुमारला आशियाई चॅम्पियन्स चषक हॉकी स्पध्रेच्या पुढील सामन्यांना मुकावे लागणार आहे. मलेशियाविरुद्धच्या लढतीत जाणीवपूर्वक चूक केल्याने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. आशियाई हॉकी महासंघाचे तांत्रिक अधिकारी रमेश अप्पू यांनी आचारसंहितेनुसार शिस्तपालन समितीसमोर चर्चा केली आणि त्यात सुरेंदर दोषी आढळला. ‘‘सुरेंदरने चेंडू अडवण्यासाठी अयोग्य रीतीने हॉकी स्टिक उंचावली आणि त्यासाठी त्याला सामनाधिकाऱ्यांनी पिवळे कार्डही दाखवले. मात्र, त्याची ही स्टिक मलेशियाच्या खेळाडूच्या हनुवटीला लागली. सुरेंदरच्या स्पष्टीकरणासह माझ्यासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्यांचा विचार केल्यानंतर त्याच्यावर दोन सामन्यांच्या बंदीचा निर्णय मी सुनावला,’’ असे अप्पू यांनी स्पष्ट केले.

 

कनिष्ठ पुरुष हॉकी संघ पराभूत

व्हॅलेन्सिया : भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाला चार देशांच्या निमंत्रितांच्या हॉकी स्पध्रेत गुरुवारी बेल्जियमविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला. या स्पध्रेच्या पहिल्या सामन्यात भारताने ३-१ अशा फरकाने जर्मनीला नमवून दणक्यात सुरुवात केली, परंतु दुसऱ्याच सामन्यात त्यांच्या कमकुवत बाबी समोर आल्या.

बेल्जियमने पहिल्याच मिनिटाला भारताची बचावफळी भेदली. आक्रमक खेळ करणाऱ्या बेल्जियमने सुरुवातीला पेनल्टी कॉर्नर मिळवला. विक्टर वेगनेझने त्याचे गोलमध्ये रुपांतर करत बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर मात्र सामन्यातील जिवंतपणा हरवला. दोन्ही संघांकडून रटाळ खेळ सुरू झाला. चौथ्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु बेल्जियमच्या लोइस व्हॅन डोरेन याने तो अडवला. ११व्या मिनिटाला भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी  हरमनप्रित सिंगने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघांनी पेनल्टी कॉर्नरच्या संधी गमावल्याने पहिल्या सत्रात सामना १-१ असा बरोबरीवरच राहिला.

मध्यंतरानंतर बेल्जियमचा वर्चष्मा राहिला. फॅब्रिक व्हॅन बोक्रिज्क (४९ मि.), अँटोइने किना (५६ मि.) आणि जॉर्ज स्टॉकब्रोक्स (५७ मि.) यांनी गोल करून बेल्जियमला ४-१ अशी मजबूत आघाडी मिळवून दिली.  ६०व्या मिनिटाला अजय यादवने भारतासाठी एक गोल केला, परंतु बेल्जियमने विजयावर मोहोर उमटवली.

 

साईप्रणीतला पराभवाचा धक्का

पॅरिस : भारताचा बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतला फ्रेंच खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील पुरुष एकेरीत पराभवाचा धक्का बसला.

जुलै महिन्यात कॅलगरी येथे झालेल्या कॅनडा खुल्या ग्रँड प्रिक्स स्पध्रेतील विजेतेपद काबीज करणाऱ्या प्रणीतला कोरियाच्या ली ह्य़ुआनने १५-२१, २१-८, २१-१९ असे पराभूत केले. स्टेड पीइरे डी कॉबेर्टिन स्टेडियमवर तासाभराच्या लढतीत ह्य़ुआनने त्याचा पराभव केला. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला प्रणीत ३-५ आणि ६-९ अशा फरकाने पिछाडीवर होता. मात्र नंतर आठ सलग गुण घेत प्रणीतने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये ली याने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत प्रणीतला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. निर्णायक गेममध्ये सुरुवातीला प्रणीत ४-१ असा आघाडीवर होता. मग त्याने ती ७-४ अशी वाढवली. मात्र ली याने सामन्याला कलाटणी देत १२-१० अशी आघाडी घेतली. त्यानंतरही ही चुरस १९-१९ गुणांपर्यंत टिकली. मात्र त्यानंतर ली याने साईला मागे टाकत प्रभुत्व मिळवले.