ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर नवोदित फिरकीपटू कुलदीप यादव  चांगलाच प्रकाशझोतात आलाय. भारताचा दिग्गज फिरकीपटू आणि ईडन गार्डन्सवर कसोटी सामन्यात हॅटट्रिकची किमया करणारा हरभजन सिंगलाही त्यानं प्रभावित केलं. कुलदीपच्या कामगिरीनंतर ऐतिहासिक कामगिरीच्या आठवणींना उजाळा देत हरभजन म्हणाला की, तोच प्रतिस्पर्धी, तेच मैदान आणि त्याच वयाचा गोलंदाज हा क्षण जुन्या आठवणींना उजाळा देणारा होता. कुलदीपची गोलंदाजी पाहून मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ मध्ये ईडन गार्डन्सवर खेळलेल्या कसोटीची आठवण झाली. कुलदीपची कामगिरी मोठे यश आहे. तो पुढे म्हणाला की, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळात हॅटट्रिकचा पराक्रम करणे कोणत्याही गोलंदाजासाठी मोठे यश असते. ही कामगिरी आगामी काळात आत्मविश्वास द्विगुणित करणारी ठरते. सध्याच्या घडीला कुलदीपची जागा घेणे कोणालाही शक्य नाही.

यावेळी त्यानं युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीचही कौतुक केले. या दोघांच्या लक्षवेधी कामगिरीमुळे रविंद्र जाडेजा आणि आर अश्विनला संघात स्थान मिळवणे कठिण होईल, असेही तो म्हणाला. संघातील युवा गोलंदाज ज्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये असतात त्यावेळी वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे स्पष्टीकरणही  त्यानं दिले.

हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटी सामन्यात हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे ईडन गार्डनच्या मैदानावरच त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हॅटट्रिक केली होती. एकेकाळी भारतीय संघाच्या प्रमुख फिरकीपटू म्हणून संघाचा आधारस्तंभ असणारा हरभजन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ७०० हून अधिक सामने खेळले आहेत.  कुलदीप यादवने यापूर्वी १९ वर्षाखालील २०१४ च्या विश्वचषकात स्कॉटलँड संघाविरुद्ध हॅटट्रिकचा पराक्रम केला होता. १९ वर्षाखालील आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज आहे.