राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने केलेल्या चुकांवर मेहनत घेत भारतीय संघ आशियाई स्पर्धेच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असून या वेळी सुवर्णपदक घेऊनच मायदेशी परतणार, असा चंग भारतीय खेळाडूंनी बाळगला आहे, असे मत भारतीय संघातील हॉकीपटू युवराज वाल्मीकी याने व्यक्त केले. आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी नवी दिल्लीत महिनाभर रंगलेल्या सराव शिबिराचा युवराज हा भाग होता; पण त्याला अंतिम संघात स्थान मिळवता आले नाही. भारतीय संघाच्या तयारीविषयी तसेच आशियाई स्पर्धेच्या रणनीतीविषयी युवराजशी केलेली ही बातचीत-
*  भारताला गेल्या वेळी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या वेळी भारताकडून कोणत्या पदकाची अपेक्षा आहे?
माझ्या मते, ९९.९ टक्के भारतीय संघ सुवर्णपदकानिशी मायदेशी परतणार आहे. प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी आशियाई स्पर्धेसाठी कोणतीही विशेष रणनीती आखलेली नाही. प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे भारतीय संघाचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक सामन्यागणिक कामगिरीमध्ये सुधारणा करत सुवर्णपदकावर नाव कोरण्याचे भारतीय संघाचे ध्येय आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीतही कमालीची सुधारणा झाली आहे.
*  आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाची तयारी कशी झाली आहे?
राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने ज्या काही चुका केल्या होत्या, त्यावर आम्ही बरीच मेहनत घेतली आहे. खडतर सराव करून आम्ही या चुकांवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. गेले महिनाभर मीसुद्धा या शिबिराचा भाग होतो, त्यामुळे खेळाडूंनी घेतलेली मेहनत मला ठाऊक आहे. कर्णधार सरदारा सिंगकडून भारताला सर्वाधिक अपेक्षा आहेत. तसेच गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने गेल्या काही सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. हॉकी हा सांघिक खेळ असल्यामुळे प्रत्येकाला सर्वोत्तम योगदान द्यावे लागते; पण या वेळी भारतीय संघ १९९८च्या सुवर्णपदकाची पुनरावृत्ती करेल, असे मला वाटते.
*  भारतीय संघाचा बचाव कमकुवत असून त्यावर कशी मेहनत घेतली गेली आहे?
भारतीय संघाचा बचाव ढिसाळ आहे, हे मला मान्य आहे; पण गेल्या २-३ महिन्यांपासून भारतीय संघाने अभेद्य बचाव करत चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही भारताची कामगिरी चांगली झाली होती. बचावासह मधली फळी आणि आघाडीच्या फळीतही भारतीय संघाने कमालीची सुधारणा केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या दोन महिन्यांच्या सराव शिबिरात आणि आता आशियाई स्पर्धेच्या शिबिरात आम्ही बचावावरच अधिक मेहनत घेतली आहे. टेरी वॉल्श हे जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहेत. भारतीय हॉकीला चांगले दिवस दाखवून देण्यासाठी ते उत्सुक आहेत.
* आशियाई स्पर्धेसाठी हॉकीमध्ये नवीन नियम आणण्यात आले आहेत. त्याचा फायदा भारताला कितपत होईल?
आशियाई स्पर्धेसाठी ७० मिनिटांऐवजी ६० मिनिटांचा सामना असणार आहेत. एरव्ही दोन सत्रांमध्ये खेळवला जाणारा सामना आता १५ मिनिटांच्या चार सत्रांत खेळवला जाणार आहे; पण या नव्या नियमांद्वारे लढण्याची सवय भारतीय खेळाडूंना आहे. हॉकी इंडिया लीगमध्ये याच नियमांनुसार भारतीय खेळाडू सामना खेळले होते. प्रत्येक संघाने या नव्या नियमांनुसार रणनीती आखली असली तरी भारतीय संघाला त्याचा बराच फायदा होणार आहे. या नियमांनुसार हॉकी हा खेळ अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.
*  आशियाई स्पर्धेत भारतासमोर कोणत्या बलाढय़ संघांचे आव्हान असणार आहे?
प्रतिष्ठेच्या स्पर्धासाठी प्रत्येक संघ जय्यत तयारी करत असतो. माझ्या मते, दक्षिण कोरिया आणि पाकिस्तान हे बलाढय़ वाटत असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर लढत असताना कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर भारतीय संघ चांगल्या फॉर्मात असून या वेळी भारतीय संघ सुवर्णपदकावर नाव कोरेल, असे मला वाटते.