अखिल भारतीय टेनिस संघटनेने नियुक्त केलेली त्रिसदस्यीय समिती च्या नि:पक्षपातीपणाबद्दल मला शंका आहे, त्यामुळे ही समिती नियुक्त करण्याचा उद्देश सफल होणार नाही, असे भारताचा ज्येष्ठ टेनिसपटू महेश भूपती याने येथे सांगितले. संघटनेविरुद्ध बंड करणाऱ्या अकरा खेळाडूंचे नेतृत्व भूपती करीत आहे.
संघटनेने बंडखोर खेळाडूंची बाजू ऐकण्यासाठी न्यायाधीश दीपक वर्मा, माजी डेव्हिसपटू नरेशकुमार व सनदी अधिकारी एम.सी.गुप्ता यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती पक्षपाती निर्णय घेईल अशी भीती व्यक्त करीत भूपती म्हणाला,‘‘ संघटनेने ही समिती स्थापन करताना मुख्य प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. या समितीस चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र भारताची एप्रिलमध्ये इंडोनेशियाबरोबर डेव्हिस लढत होणार आहे. त्यापूर्वी या समितीचे काम पूर्ण होण्याची आवश्यकता आहे तरच भारतास अव्वल दर्जाच्या खेळाडूंसह खेळता येईल. संघटनेस आमच्या समस्या त्वरित दूर करण्याची इच्छाच दिसत नाही. संघटनेतील एखादा जबाबदार पदाधिकारी आम्हास भेटून समस्यांवर त्वरित तोडगा काढील अशी आमची अपेक्षा होती. समितीमधील नरेशकुमार यांचा अपवाद वगळता अन्य दोन सदस्यांचा टेनिसशी दुरान्वये संबंध नाही.’’
‘‘आम्ही आमची बाजू अनेक वेळा मांडली आहे आणि आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत. आम्ही केलेल्या सूचनांमुळे देशाच्या टेनिस क्षेत्राची प्रगतीच होणार आहे. संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोन्मय चटर्जी यांनी खेळाडूंबाबत अतिशय अनुचित उद्गार व्यक्त केले आहेत. आम्ही संघटनेस ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप त्यांनी आमच्यावर केला आहे.
हे उद्गार अतिशय अयोग्य आहेत. संघटनेच्या कारभाराबाबत बोलण्यासारखे बरेच काही आहे,’’ असेही भूपती याने सांगितले.