एकूण सात खेळाडू पात्र परंतु ऑलिम्पिकला तिघांनाच संधी

‘‘देबोराच्या कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावत चालला आहे. तिला जागतिक दर्जाच्या सर्व सुविधा साइकडून मिळत आहेत. पण जागतिक दर्जावर खेळण्यासाठी ज्या पद्धतीची सायकल हवी ती मात्र तिच्याकडे नाही. जागतिक स्तरावरील खेळाडू जी सायकल वापरतात त्याची किंमत १२ लाख रुपये एवढी आहे. ही सायकल घेण्याइतपत तिची आर्थिक परिस्थिती सुदृढ नाही. त्यामुळे समाजातून काही दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन तिच्या सायकलसाठी आर्थिक मदत द्यावी, ’’ असे आवाहन तिचे प्रशिक्षक आर. के. शर्मा यांनी केले आहे.

जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पध्रेत शनिवारी भारताच्या चार खेळाडूंनी रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील २० किमी चालण्याच्या शर्यतीची पात्रता मिळवली. के. टी. इरफान, के. गणपती, देवेंदर सिंग आणि नीरज या चौघांसह आता एकूण सात खेळाडूंनी २० किमी चालण्याच्या शर्यतीचे ऑलिम्पिक निकष पूर्ण केले आहे. ऑलिम्पिक नियमानुसार एका देशातून केवळ तीनच खेळाडूंना एका क्रीडा प्रकारात सहभाग घेता येणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी कोणाला पाठवायचे हा पेच निर्माण झाला आहे.

ऑलिम्पिक पात्रतेसाठी १ तास २४ मिनिटे असलेल्या वेळेपूर्वीच या चौघांनी ही शर्यत पूर्ण केली. राष्ट्रीय स्पध्रेत उत्तराखंडच्या गुरमीत सिंगने २० किमी चालण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. त्याने १ तास २१ मिनिटे २४.५७ सेकंदाची वेळ नोंदवून बाजी मारली. तामिळनाडूच्या के. गणपती (१:२१:५१.४३) आणि हरयाणाच्या संदीप कुमार (१:२१:५६:८१) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. राष्ट्रीय विक्रम नावावर असलेला केरळचा के. टी. इरफान (१:२२:१४.०२), उत्तराखंडचा मनीष सिंग (१:२२:१८.८९), हरयाणाचा देवेंदर सिंग (१:२२:४.६०) आणि नीरज (१:२३:३४.०२) यांनीही ऑलिम्पिक पात्रता वेळेत शर्यत पूर्ण केली. यापैकी गणपती, इरफान, देवेंदर आणि नीरज यांनी या स्पध्रेतील कामगिरीतून ऑलिम्पिक पात्रता मिळवली, तर गुरमीत, संदीप आणि मनीष यांनी गेल्या वर्षीच ही पात्रता मिळवली होती.

मात्र, एका देशाकडून केवळ तीनच खेळाडूंना या क्रीडा प्रकारात सहभाग घेता येणार असल्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे. या खेळाडूंपैकी मनीष आणि संदीप यांनी २० आणि ५० किमी अशा दोन्ही प्रकारांत ऑलिम्पिक पात्रता निकष पूर्ण केले आहेत. हे दोघेही ५० किमी चालण्याच्या शर्यतीतील प्रमुख खेळाडू असल्याने ते या प्रकारातून ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतील. त्यामुळे २० किमी प्रकारात कोणाला पाठवायचे याचा निर्णय भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाला घ्यावा लागणार आहे.

महिलांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमधारी खुशबीर कौरने सुवर्णपदक पटकावले. तिने १ तास ३४ मिनिटे ५२.७० सेकंदाची वेळ नोंदवली. खुशबीरने गेल्या वर्षीच ऑलिम्पिक निकष पूर्ण केले आहेत. सपनाने १ तास ३६ मिनिटे ५९.३६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकासह ऑलिम्पिक पात्रता मिळवली, तर उत्तर प्रदेशच्या प्रियांकाने (१:४०:५८.९३) कांस्यपदक जिंकले. महिलांसाठी एक तास ३६ मिनिटे ही ऑलिम्पिक पात्रता निकष वेळ आहे.