न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपल्या वाढत्या वयामुळे निर्माण होणाऱय़ा मर्यादांबाबत चिंता व्यक्त केली आहे. आता आपल्यामध्ये आधीसारखा जोश आणि चपळता राहिलेली नाही, अशी कबुली खुद्द धोनीने मोहालीतील सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. धोनीच्या या कबुलीमुळे तो आगामी काळात देखील संघात चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे.

चोरट्या धावा काढून स्ट्राईकची अदलाबदल करण्यात धोनीचा हातखंडा राहिला आहे. धोनीचा जोश पाहून सहकारी फलंदाजामध्येही उत्साह संचारतो. ‘रनिंग बिटविन द विकेट’साठी धोनीच्या चपळतेचे उदाहरण क्रिकेटविश्वात दिले जाते. पण आता धोनीने आपल्या खेळावर मर्यादा येत असल्याची जाणीव होऊ लागली असल्याचे विधान पत्रकार परिषदेत केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. धोनी म्हणाला की, चोरट्या धावा काढून स्ट्राईकची अदलाबदल करत राहण्यासाठीचा जोश थोडा कमी झाला आहे. मी जवळपास २०० हून अधिक सामन्यांत खालच्या क्रमांकावर येऊन परिस्थितीनुसार फलंदाजी केली आहे. पण आता खेळपट्टीवर वेगाने धावण्याची क्षमता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार नाही, तर मनसोक्त फलंदाजी करता यावी यासाठी मी वरच्या स्थानावर फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.

धोनी सध्या ३५ वर्षांचा असून एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्याने याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरून उल्लेखनीय खेळी केली. धोनीने विराट कोहलीसोबत १५१ धावांची भागीदारी रचून संघाला सामन्यावर पकड निर्माण करून दिली. धोनीला चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरणे सोयीस्कर वाटत असल्याने आगामी सामन्यांमध्ये देखील धोनी याच स्थानावर फलंदाजीला उतरताना पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.

खालच्या क्रमवारीत फलंदाजीला उतरताना तुम्हाला स्ट्राईकची सारखी अदलाबदल करता येणे खूप महत्वाचे असते. यासोबतच तुमच्या मागे चांगला फलंदाज नाही, याची जाणीव ठेवून विकेट न टाकता खेळत राहणे हे खूप जिकरीचे काम आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये स्ट्राईकची अदलाबदल करताना माझ्यात आधीसारखा जोश राहिला नसल्याची जाणीव मला झाली. मी क्षेत्ररक्षण करणाऱया खेळाडूंच्या डोक्यावरून हवेत फटके चांगले मारू शकतो याची कल्पना असल्यानेच वरच्या स्थानावर फलंदाजी करण्याचा निर्णय मी घेतला. त्यामुळे दडपण न घेता खेळ करता आला आणि चांगल्या धावा देखील वसुल करता आल्या, असेही धोनी पुढे म्हणाला.