टोनी क्रूसने केलेल्या सुरेख गोलच्या जोरावर रिअल माद्रिद संघाला सेल्टा व्हिगो संघाविरुद्धच्या ला लीग फुटबॉलमध्ये २-१ असा निसटता विजय मिळवता आला.

दुखापतग्रस्त ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या अनुपस्थितीत कमकुवत झालेल्या रिअल माद्रिदला हा सामना जिंकताना संघर्ष करावा लागला. अल्वारो मोराटाने रिअल संघाचे खाते उघडले. मात्र फॅबियानो ओरेलानाने हेडिंगच्या साहाय्याने अप्रतिम गोल करीत व्हिगो संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना क्रूस याने जमिनीलगत फटका मारून गोल केला आणि संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी कायम ठेवीत रिअल संघाने विजय मिळवत तीन गुण वसूल केले.

या स्पर्धेतील अन्य सामन्यात अ‍ॅटेलटिको माद्रिद संघास लिगानेस या नवोदित संघाने गोलशून्य बरोबरीत रोखले. लिगानेस संघाचा गोलरक्षक जॉन सेरान्टेस याने केविन गॅमिरो व फर्नान्डो टोरेस यांचे फटके अडवले. त्यामुळेच त्यांचा पराभव टळला. व्हॅलेन्सिया संघास ऐबार संघाकडून ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला.