इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक टोनी ग्रेग यांचे शुक्रवारी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. यावर्षी मे महिन्यापासून त्यांच्यावर दम्याच्या आजारासंबंधी उपचार सुरू होते. तर ऑक्टोबरमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. अत्यंत नाजूक अवस्थेत असताना ग्रेग यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथेच त्यांचे निधन झाले. श्रीलंकेत झालेल्या टि-ट्वेन्टी विश्वचषकानंतर त्याची तपासणी करण्यात आली होती.      
सिडनी मार्निंग हेराल्ड ने म्हटले की, ‘आस्ट्रेलियाहून परतल्यानंतर त्यांच्या उजव्या फुफ्फुसामधून तरल पदार्थ बाहेर पडला. त्याची चाचणी केल्यानंतर लक्षात आले की त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग आहे. ग्रेग यांचे पुत्र मार्क यांनी वृत्तपत्राशी बोलताना म्हटले की त्यांच्य़ा वडिलांचा कर्करोग चौथ्या टप्प्यापर्यंत पोहचला होता.  
आस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ग्रेग यांना आपल्या कर्करोगाविषयी कळले होते. टोनी ग्रेग यांनी आपल्या १९७२ ते १९७७ या क्रिकेट कारकिर्दीत ५८ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामने खेळले. त्यांच्या जादुई आवाजाने क्रिकेटचे अनेक सामने रंगतदार केले होते.