लागोपाठच्या विविध स्वरूपाच्या सामन्यांमुळेच भारतीय क्रिकेट संघास इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवास सामोरे जावे लागले, असे भारताचे ज्येष्ठ गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी येथे सांगितले. पिअरसन एज्युकेशनतर्फे तळेगाव दाभाडे येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन श्रीनाथ यांच्या हस्ते व पिअरसन एज्युकेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीना गणेश यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पिअरसनचे अध्यक्ष उमाशंकर विश्वनाथ हेही या वेळी उपस्थित होते.
उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्रीनाथ यांनी सांगितले, भारतीय संघास सध्या बऱ्याच आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. ट्वेन्टी-२०, एक दिवसीय सामने, आयपीएल सामने यामुळे खेळाडूंना अपेक्षेइतकी शारीरिक व मानसिक विश्रांतीच मिळत नाही. भारतीय संघ कसोटी सामन्यांमध्ये पुन्हा गौरवशाली कामगिरी करील असा मला आत्मविश्वास आहे.
भारतीय संघाकडे सध्या विजय मिळवून देणारा द्रुतगती गोलंदाज नाही यावर मत विचारले असता श्रीनाथ म्हणाले, भारताने एक दिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकला असला, तरी द्रुतगती गोलंदाज तयार करण्यासाठी ठिकठिकाणी अकादमी स्थापन करण्याची आवश्यकता आहे आणि अशा अकादमींमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधाही असणे जरुरीचे आहे. आम्ही कर्नाटकमध्ये ठिकठिकाणी अकादमी  सुरू केल्या आहेत आणि अशा अकादमींमधून क्रिकेटसाठी चांगले नैपुण्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने गहुंजे येथे सुरेख स्टेडियम बांधले असून त्यामुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची चांगली संधी मिळणार आहे असे सांगून श्रीनाथ म्हणाले, अव्वल दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर दिला पाहिजे. खेळाडूंमधील गुणवत्तेचा विकास करण्यासाठी त्यांना अव्वल दर्जाचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
शाळांमधून खेळ हा कमी होत चालला आहे. केवळ अभ्यास हा महत्त्वाचा नसून त्याबरोबर शारीरिक व मानसिक वाढीसाठी खेळ ही अनिवार्य गोष्ट आहे. प्रत्येक शाळेने अभ्यासाबरोबरच खेळ व अन्य विविध उपक्रमांवरही भर दिला पाहिजे असेही श्रीनाथ यांनी सांगितले.
श्रीनाथ यांचे अजूनही अनेक चाहते!
श्रीनाथ यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून बराच कालावधी झाला असला, तरी त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही याचा प्रत्यय येथे दिसून आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या व त्यांच्याबरोबर छायाचित्रेही काढली. खेळाडूंबरोबरच तेथील शिक्षक व पालकांनीही श्रीनाथ यांच्या समवेत छायाचित्रे काढली. श्रीनाथ यांनीही आढेवेढे न घेता चाहत्यांची इच्छा पूर्ण केली.