जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या फर्नाडो टोरेसच्या शानदार गोलच्या जोरावर चेल्सीने क्लब विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. चेल्सीने मॉन्टेरीवर ३-१ने मात करत दिमाखदार विजय साकारला.
सामना सुरू झाल्यानंतर १७व्या मिनिटाला ऑस्करने अ‍ॅशले कोलकडे पास दिला. कोलच्या पासचा उपयोग करुन घेत माटाने चेल्सीचे खाते उघडले. यानंतर चेल्सीतर्फे गोलसाठी प्रयत्न झाले पण त्यांना यश मिळाले नाही. मध्यंतरानंतर लगेचच टोरेसने इडन हॅझार्डच्या पासवर डाव्या पायाने गोल करत चेल्सीला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर ज्युऑन मोटाचा क्रॉस अडवताना माँन्टेरीच्या डार्विन चावेझने स्वयंगोल केला आणि चेल्सीने ३-० अशी आगेकूच केली.
टोरेसने चेल्सीसाठी सलग तीन सामन्यांत गोल केले आहेत. २०११ मध्ये चेल्सीतर्फे खेळायला सुरुवात केल्यानंतर टोरेसची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या हंगामात त्याच्या नावावर १२ गोलची नोंद आहे.
टोरेसला चांगला सूर गवसला आहे. त्याच्या खेळातली अचूकता अनेकपटींनी वाढली आहे. त्याच्यासाठी आणि चेल्सीसाठी ही सकारात्मक गोष्ट आहे.
अंतिम फेरीतही तो अशीच कामगिरी करेल असा विश्वास चेल्सीचे व्यवस्थापक राफा बेनिटेझ यांनी व्यक्त केला. रविवारी होणाऱ्या अंतिम मुकाबल्यात चेल्सीची लढत कॉर्निथिअन्सशी होणार आहे. दरम्यान, कालरेस अरांडाने अतिरिक्त वेळेत झळकावलेल्या एकमेव गोलच्या आधारे रिअल झारागोझाने कोपा डेलरे फुटबॉल स्पर्धेत लेव्हान्टेवर १-० अशी मात केली.