थरारानुभव !

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने आज रंगणार पहिला ट्वेन्टी-२० सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांमध्ये

पीटीआय बंगळुरू | December 25, 2012 3:59 AM

भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने
आज रंगणार पहिला ट्वेन्टी-२० सामना
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी देशांमध्ये कितीही तणाव, आकस, सूडभावना असो, पण या दोन्ही देशांमधला हा सारा द्वेष दूर करून सलोख्याचा एकमेव राजमार्ग क्रिकेटच्या २२ यार्डामधून जातो. २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर हे दोन्ही देश पहिल्यांदाच मालिका खेळण्यासाठी सज्ज झालेले असून या मालिकेतील पहिला ट्वेन्टी-२० सामना मंगळवारी रंगणार आहे तो चिन्नास्वामी स्टेडियमवर. भारत-पाकिस्तान यांच्यातील ट्वेन्टी-२० सामन्याचा थरारानुभव अनुभवण्यासाठी बंगळुरूवासीय सज्ज झाले आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटपटू मंगळवारी मैदानात ईर्षेने उतरतील ते विजयाचा ध्वज फडकावण्यासाठीच, पण या वेळी क्रिकेटच्या ‘जंटलमन’ प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. त्याचबरोबर प्रेक्षकांनीही हे फक्त क्रिकेट आहे, युद्ध नव्हे, या विचाराने खेळ पाहिल्यास कोणताही संघ जिंको, विजय क्रिकेटचाच होईल.    

वैयक्तिक कामगिरीवर लक्ष देणार – धोनी
बंगळुरू : क्रिकेट सामना म्हटलं की नाणेफेक आणि खेळपट्टीला महत्त्व असतं, पण त्याहीपेक्षा वैयक्तिक कामगिरीवर लक्ष द्यायला हवं असं मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले आहे.
खेळाडू वैयक्तिक कामगिरी कशी करतात, हे सर्वात महत्त्वाचे आहे. कामचलाऊ गोलंदाजांची आणि फलंदाजांची कामगिरीही तेवढीच महत्त्वाची आहे. सामन्याच्या सुरुवातीला आम्ही लक्ष्य ठरवणार नाही तर ५-६ षटकांनंतर लक्ष ठरवून त्यावर मेहनत घेऊ. सामन्याची चांगली सुरुवात कशी करता येईल, यावर आमचं लक्ष असेल, असे धोनी म्हणाला.    

आमची गोलंदाजी भारतासाठी आव्हानात्मक -हफीझ
बंगळुरू : आमच्या गोलंदाजीमध्ये वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा चांगला समन्वय आहे. त्यामुळे भारताच्या फलंदाजांसाठी आमची गोलंदाजी नक्कीच आव्हानात्मक असेल, असे मत पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हफिझने व्यक्त केले आहे.
क्रिकेट विश्वाला भारतासाठी फलंदाजी हे बलस्थान असल्याचे माहिती आहे, पण सामना फक्त फलंदाजीच्या जोरावर जिंकता येत नाही, गोलंदाजीचाही विजयामध्ये महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा तुम्ही आमच्या संघाकडे बघाल तेव्हा फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजू आमच्या चांगल्या आहेत. आमची गोलंदाजी अचूक आणि भेदक असून भारतीय फलंदाजांसाठी ती नक्कीच आव्हानात्मक असेल, असे हफीझ म्हणाला.    

भारत बलस्थाने
 फलंदाजी : सुरुवातीपासूनच फलंदाजी हे भारताचे बलस्थान राहीलेले आहे आणि ते संघाने अजूनपर्यंत चांगले टिकवलेले आहे. इंग्लंडविरुद्धच्या गेल्या सामन्यात विराट कोहली, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर भारताने १७७ धावांपर्यंत मजल मारली होती. गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे यांनी कामगिरीत प्रगती केल्यास भारताची फलंदाजी अधिक भक्कम होऊ शकते. रोहित शर्माला चांगली संधी मिळाली असून तो मोठी खेळी साकारून या संधीचे सोने करणार का, याकडे संघाचे लक्ष नक्कीच असेल.
कच्चे दुवे
 गोलंदाजी : भारतीय संघात युवा गोलंदाजांचा भरणा असला तरी गोलंदाजी बोथट आणि निष्क्रिय दिसते. अशोक दिंडाकडे चांगली गुणवत्ता असली तरी त्याच्यामधील अननुभवाने त्याची कामगिरी उजळताना दिसत नाही. आर. अश्विन, पीयूष चावला, परविंदर अवाना यांना अजूनही सूर सापडलेला दिसत नाही.

 क्षेत्ररक्षण : बोथट गोलंदाजीबरोबरच गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताने बऱ्याचदा सामने गमावले असले तरी त्यामध्ये कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही. क्षेत्ररक्षणात सुधारणा झाली नाही तर पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करून भारतावर सामना गमावण्याची वेळ येऊ शकते.     

लक्षवेधी
 युवराज सिंग : अष्टपैलू युवराज सिंग हा सध्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा कणा आहे. फलंदाजीबरोबर भेदक गोलंदाजी युवराजकडून पाहायला मिळते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात त्याने त्याचे अष्टपैलुत्व सिद्ध केले. तर दुसऱ्या सामन्यात जिथे महत्त्वाच्या गोलंदाजांना बळी मिळत नव्हते तिथे युवराजने तीन फलंदाजांना बाद करत भारताच्या बाजूने सामना फिरवण्याचा प्रयत्न केला होता. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेमध्ये मालिकावीराचा मानकरी युवराजच ठरला होता. त्यामुळे पाकिस्तानची त्याच्यावर करडी नजर असेल.
 विराट कोहली : २०१२ मधला भारताचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज म्हणून कोहलीचे नाव घेता येईल. विकेट्स पडत असल्या तरी प्रतिस्पध्र्यावर आक्रमण करायचे कोहली विसरत नाही. वानखेडेच्या सामन्यात २० चेंडूंत ३८ धावांची खेळी साकारत त्याने संघाची गाडी रुळावर आणली होती.
 महेंद्रसिंग धोनी : आक्रमक फलंदाज आणि चाणाक्ष कर्णधार अशी धोनीची साऱ्यांनाच ओळख आहे. वानखेडेच्या सामन्यात धोनीने फक्त १८ चेंडूंत ३८ धावांची खेळी साकारत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. ट्वेन्टी-२० क्रिकेटचा धोनीचा चांगलाच अभ्यास असून धोनीच्या डावपेचांना खेळाडूंची चांगली साथ मिळाली तर भारतीय संघ नक्कीच जिंकू शकतो.     

पाकिस्तान बलस्थाने
 फलंदाजी : गोलंदाजीखालोखाल फलंदाजीतही पाकिस्तानचा संघ उत्तम आहे. सलामीला कर्णधार मोहम्मद हफिझपासून सातव्या क्रमांकापर्यंत त्यांच्याकडे चांगले आणि सामना फिरवू शकणारे फलंदाज आहे. कामरान आणि उमर हे अकमल बंधूंच्या कामगिरीवर नक्कीच साऱ्यांचे लक्ष असेल. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये चमक दाखवणारा अष्टपैलू शाहिद आफ्रिदी फलंदाजीमध्ये गोलंदाजांची पिसे काढतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

 गोलंदाजी : भेदक आणि अचुक मारा हे पाकिस्तानचे वैशिष्टय़ अजूनही कायम आहे. वेगवान गोलंदाजीबरोबरच फिरकी गोलंदाजीचा योग्य समन्वय त्यांच्या संघामध्ये दिसतो. एकटय़ा गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकण्याची पाकिस्तानची कुवत असून अनुभवी व युवा गोलंदाजांचा चांगला समन्वय संघात आहे. उमर गुल आणि सोहेल तन्वीर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल, तर सइद अजमल आणि अष्टपैलू  शाहिद आफ्रिदी फिरकी गोलंदाजीची धुरा वाहतील.
कच्चे दुवे
 क्षेत्ररक्षण : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या खेळामध्ये एकच समान प्रकार आढळतो आणि तो म्हणजे गचाळ क्षेत्ररक्षण. पाकिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही चांगल्या दर्जाची आहे, पण क्षेत्ररक्षणात मात्र कोणत्याही खेळाडूवर विश्वास ठेवता येणार नाही.    

लक्षवेधी
 शाहिद आफ्रिदी : सध्याचा क्रिकेट वर्तुळातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू, अशी आफ्रिदीची ओळख आहे. गोलंदाजीमध्ये भल्या भल्या फलंदाजांची त्याने भंबेरी उडवली आहे आणि सर्वाधिक बळीही त्याच्याच नावावर आहेत. आफ्रिदीच्या फलंदाजीत सध्या धार दिसत नसली तरी अनपेक्षितपणे तो कधीही फलंदाजीच्या जोरावर सामना फिरवू शकतो.
 उमर गुल : पाकिस्तानचं सध्या सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे उमर गुल. वेग, अचूकता आणि अनुभव यांचा योग्य समन्वय गुलच्या गोलंदाजीमध्ये दिसतो. संघाला बऱ्याचदा त्याने विजयासमीप नेऊन ठेवण्याचे काम चोख बजावले आहे. भेदक गोलंदाजीबरोबर उपयुक्त फलंदाजीही गुल करतो. पाकिस्तानसाठी वेगवान गोलंदाजीमधला गुल हा हुकमी एक्का आहे.
 सईद अजमल : क्रिकेटजगतातील भल्या भल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवणारा दर्जेदार फिरकीपटू म्हणजे सईद अजमल. साकलेन मुश्ताकनंतर पाकिस्तानला त्याच्या जवळपास जाणारा फिरकीपटू अजमलच्या रूपात मिळाला आहे. भारतीय फलंदाजांना यापूर्वीही त्याने चांगलेच हैराण केले असून या वेळी भारतीय फलंदाजांच्या नजरा त्याच्यावर असतील. आशियातील खेळपट्टीचा त्याला चांगला अंदाज असल्याने तो या मालिकेत नक्कीच प्रभावी ठरू शकतो.     

First Published on December 25, 2012 3:59 am

Web Title: tremendous match will going to start