श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींना आजच्या विज्ञान युगात फारसा थारा नसला तरी काही गोष्टी अनाकलनीय  पद्धतीने घडत असतात, त्याला काय म्हणावे? भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही दिवसांमध्ये उपहारानंतरच्या २-३ षटकांमध्ये फलंदाज बाद होतो आणि सामन्याला कलाटणी मिळते, हीच गोष्ट तिसऱ्या दिवशीही तशीच पाहायला मिळाली. सॅम रॉबसन व गॅरी बॅलन्स ही इंग्लंडची जोडी उपहारानंतर दुसऱ्याच षटकात फुटली आणि इंग्लंडच्या डावाची पडझड सुरू झाली. जो रूटने नाबाद अर्धशतक झळकावल्याने तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची ९ बाद ३५२ अशी स्थिती असून ते अजूनही १०५ धावांनी पिछाडीवर आहेत. इंग्लंडच्या डावाची झालेली घसरण आणि त्यानंतर रूटचे नाबाद अर्धशतक यामुळे शुक्रवारचा दिवस आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर चांगलाच झुलला.
भारताने पहिल्या डावात केलेल्या ४५७ धावांना उत्तर देताना इंग्लंडने १ बाद ४३ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. रॉबसन व बॅलन्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली १२५ धावांची भागीदारी हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. पण उपाहारानंतरच्या ‘स्पेल’मध्ये इशांतने या दोन्ही फलंदाजांबरोबरच इयान बेल (२५) यालाही तंबूत धाडले आणि त्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत आला.
रॉबसन व बॅलन्स यांनी उपाहारापर्यंतच्या खेळात निर्विवाद वर्चस्व गाजविले. ही जोडी फोडण्यासाठी भारताने पाचही प्रमुख गोलंदाजांचा आलटून-पालटून उपयोग केला, मात्र त्यांचा प्रभाव या जोडीवर पडला नाही. या दोन्ही फलंदाजांनी आपापली अर्धशतके प्रत्येकी १२३ चेंडूंत पूर्ण केली. उपाहारापर्यंत इंग्लंडने ४८ षटकांत १ बाद १३१ धावा केल्या होत्या. पण उपाहारानंतर दुसऱ्याच षटकात ही जोडी फोडण्यात इशांतला यश मिळाले. त्याने रॉबसनला पायचीत करीत इंग्लंडला धक्का दिला. रॉबसन याने ५९ धावा करताना आठ चौकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर बॅलन्स हा फार वेळ टिकला नाही. त्यालाही इशांतने पायचीत केले. बॅलन्सने नऊ चौकारांसह ७१ धावा केल्या. इयान बेल याने काही सुरेख चौकार मारून चांगली सुरुवात केली, मात्र इशांतच्या षटकात यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर त्याने यष्टीमागे महेंद्रसिंग धोनी याच्याकडे झेल दिला. बेलनंतर मोइन अलीसहीत (१४) इंग्लंडने तीन विकेट्स पाच धावांमध्ये गमवाल्या. पण त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड (नाबाद ४७) आणि जेम्स अँडरसन (नाबाद २३) यांनी रूटला सुरेख साथ दिल्यामुळे इंग्लंडला ३५२ धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार बळी घेतले. रूटने ८ चौकारांसह नाबाद ७८ धावांची अप्रतिम खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ४५७
इंग्लंड (पहिला डाव) : १०६  षटकांत ९ बाद ३५२ (गॅरी बॅलन्स ७१, सॅम रॉबसन ५९, जो रूट खेळत आहे ७८; भुवनेश्वर कुमार ४/६१, इशांत शर्मा ३/१०९, मोहम्मद शमी २/९८)