भारत-कोलंबिया यांच्या लढतीची संपूर्ण तिकिटविक्री झाल्याचा दावा; सामन्याच्या एक तास आधीही खिडकीवर तिकीट उपलब्ध=

भारत आणि कोलंबिया यांच्या लढतीसाठीची संपूर्ण तिकिटे विकली गेल्याचा दावा आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) संकेतस्थळावरील तिकिटविक्री पानावर शुक्रवारीच करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष येथील तिकीट खिडक्यांवर सोमवारी सायंकाळपर्यंत तिकिटविक्री सुरू होती. त्यामुळे पुन्हा एकदा ‘फिफा’च्या संकेतस्थळावर तपासले असता त्यावर सर्व तिकिटांची विक्री झाल्याचे दाखवत होते. एकीकडे ‘फिफा’च्या संकेतस्थळावर संपूर्ण तिकिटविक्री झाल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्ष खिडकीवर विक्री सुरू होती आणि त्यामुळे गोंधळाचे वातावरण होते. त्यात अधिक भर पडली ते स्टेडियमवरील प्रत्यक्ष उपस्थितीने. सर्व तिकिटांची विक्री झाली असताना स्टेडियम मात्र रिकामे होते. स्पर्धा संयोजन समितीने रविवारी सांगितले होते की, ‘‘स्टेडियममधील ठरावीक तिकिट्स आरक्षित असतात आणि उर्वरित तिकिटांची विक्री केली जाते. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या तिकिटांची विक्री झाल्यानंतर संकेतस्थळावर ‘हाऊसफुल्ल’ असे दर्शवले जाते.’’

टप्प्याटप्प्यांत तिकीट विक्री

‘फिफा’च्या आयोजन समितीने सामान्य प्रेक्षकांसाठी खिडकीवर ठेवलेल्या तिकीटांची विक्री एकत्र न करताना टप्प्याटप्यात केल्यामुळे सतत संकेतस्थळावर सर्व तिकीटांची विक्री झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात सामन्याच्या दिवशी सर्व तिकीट विकली गेल्याचा दावा होत असूनही स्टेडियम मात्र अपेक्षेइतके भरलेले नव्हते. हे चित्र केवळ नवी दिल्लीपुरते नाही, तर कोची व गोवा येथेही पाहायला मिळाले.

स्थानिक आयोजन समितीची मंत्रालयाकडे मदत

कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या नवी दिल्ली येथील पहिल्याच लढतीत प्रेक्षकांच्या रोषाला स्थानिक आयोजन समितीला सामोरे जावे लागले होते. धुळीने भरलेल्या खुच्र्या, अस्वच्छ प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची नसलेली सोय या सर्वावरून प्रेक्षकांनी ‘फिफा’चे वाभाडे काढले. प्रसिद्धी माध्यमांनीही हा मुद्दा लावून धरला. त्यामुळेच असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी स्थानिक आयोजन समितीने क्रीडा मंत्रालयाकडे मदत मागितली. क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांनी आयोजन समितीला संपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे स्पध्रेच्या दुसऱ्या लढतीत सर्व काही सुरळीत पाहायला मिळाले.

वेळ : सायंकाळी ५ वा.

  • क-गट : कोस्टा रिका वि. गिनी.
  • ड-गट : स्पेन वि. नायजर.

वेळ : रात्री ८ वा.

  • क-गट : इराण वि. जर्मनी
  • ड-गट : उत्तर कोरिया वि. ब्राझील

थेट प्रक्षेपण

  • इंग्रजी : सोनी टेन २ व टेन २ एचडी,
  • सोनी ईएसपीएन व ईएसपीएन एचडी;
  • हिंदी व बंगाली : सोनी टेन ३ व टेन ३ एचडी.