कुमार विश्वचषक स्पध्रेत भारतासाठी पहिला गोल नोंदवण्याचा मान मणिपूरच्या जॅक्सन थौनाओजामने मिळवला. पण कोलंबियाविरुद्धचा हा सामना जिंकला असता तर या ऐतिहासिक गोलचा आनंद द्विगुणित झाला असता, असे जॅक्सनने सामन्यानंतर सांगितले.

‘‘हा सर्वोत्तम अनुभव होता आणि गोलनंतर आकाश ठेंगणे झाल्यासारखे भासत होते. आम्ही सर्वोत्तम खेळ केला, परंतु दुर्दैवाने अपयश आले. फिफा विश्वचषक स्पध्रेत देशासाठी गोल करणे, ही अभिमानास्पद कामगिरी आहे. मात्र विजयाने हा आनंद अधिक वाढला असता. आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ काय असतो, हे आम्हाला दोन लढतींतून शिकायला मिळाले,’’ असे जॅक्सन म्हणाला.

मणिपूर येथील थौबाल जिल्ह्यात जॅक्सनचा जन्म झाला. २०१५मध्ये त्याचे वडिल कोथौजाम देबेन सिंग यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यांना मणिपूर पोलिसातील नोकरी सोडावी लागली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबीयाची जबाबदारी आईवर आली. त्याची आई घरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ख्वाइरामबंद बाजारात फळे विकून घरखर्च चालवते.

जॅक्सनची प्रशंसा करताना कर्णधार अमरजित सिंग म्हणाला की, ‘‘विश्वचषक स्पध्रेत देशासाठी पहिला गोल करणाऱ्या जॅक्सनचा अभिमान वाटतो. नशीब आमच्यावर रुसले होते. गोल करण्याची एक संधी गोलखांब्याला लागून हुकली. सर्वाना आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव घेता आला, याचा आनंद आहे. विश्वचषक स्पध्रेत खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि माझे स्वप्न पूर्ण झाले.’’

फुटबॉलसाठी जॅक्सनचा दोन दिवस उपवास

फिफा कुमार विश्वचषक स्पध्रेत पहिला गोल नोंदवत ऐतिहासिक कामगिरी करणारा जॅक्सन सिंग थौनाओजाम हा या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी दोन दिवस उपाशी राहिला होता, अशी माहिती त्याची आई बिलासिनी देवी यांनी दिली.

जॅक्सनला बालपणापासून फुटबॉलची विलक्षण आवड आहे. मात्र अजूनही आपल्या देशात खेळापेक्षा शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जाते. जॅक्सनच्या आई-वडिलांनी त्याला फुटबॉलऐवजी मोठेपणी सनदी अधिकारी होण्यासाठी अभ्यासावर लक्ष देण्याची सूचना केल्यानंतर त्याला खूप राग आला. दोन दिवस तो उपाशी राहिला. त्यामुळे तो आजारी पडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याला असा सल्ला दिला नाही, असे बिलासिनी यांनी सांगितले.

आजचे सामने

वेळ : सायंकाळी ५ वा.

  • इ-गट : फ्रान्स वि. जपान.
  • फ-गट : इंग्लंड वि. मेक्सिको.

वेळ : रात्री ८ वा.

  • इ-गट : होंडुरास वि. न्यू कॅलेडोनिया.
  • फ-गट : इराक वि. चिली.

थेट प्रक्षेपण

इंग्रजी : सोनी टेन २ व टेन २ एचडी, सोनी ईएसपीएन व ईएसपीएन एचडी; हिंदी व बंगाली : सोनी टेन ३ व टेन ३ एचडी.