वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे विश्वविजेतेपद पटकावले. वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच अंडर १९ वर्ल्डकप पटकावला आहे.
वेस्ट इंडिजचा डाव सुरु झाल्यानंतर प्रारंभीच पोपच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या ३ धावांवर अवेश खानने त्याला अहमदकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या २८ धावा असताना इमला १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हेटमायर आणि कार्टीने तिस-या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच डागरने हेटमायरला २३ धावांवर अरमान जाफरकरवी झेलबाद केले. ७१ धावांवर स्प्रिंजरच्या रुपाने चौथा त्यानंतर काही धावांच्या अंतराने गुलीच्या रुपाने पाचवा गडी बाद झाला. पण वेस्ट इंडिजच्या संघाने त्यानंतर चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले. अखेर, अहमदच्या चेंडूवर एक धाव घेत पॉलने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, त्याआधी प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय संघातील ऋषभ पंत आणि ईशान किसन यांनी भारतीय डावाची सुरवात केली. पहिल्याच षटकांत या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतला जोसेफच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक तेवीन इमलाचने यष्टीचीत बाद केले. त्यानंतर अनमोलप्रीत सिंगही जोसेफकरवी बाद झाला. भारताच्या अवघ्या २७ धावा झालेल्या असताना कर्णधार किसनच्या रुपात तिसरी विकेट गमवावी लागली. वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीत बढती देण्यात आली. मात्र, तोही ५७ चेंडूत अवघ्या ७ धावा करून परतला. सर्फराज खान एका बाजूने टिकून फलंदाजी करत होता. पण, दुसऱ्या बाजूला एकामागून एक विकेट पडत असल्याने भारत शतक पूर्ण करेल की नाही. अशी शंका होती. अखेर सर्फराजने झळकाविलेल्या अर्धशतकामुळे भारताने धावांचे शतक ओलांडले. पण ५१ धावा होताच सर्फराज पायचीत बाद झाला. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी दिलेल्या अवांतर २३ धावा या भारताच्या धावसंख्येतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा होत्या. अखेर ४६ व्या षटकांत भारताचा डाव १४५ धावांत संपुष्टात आला.