यु मुंबाने एनएससीआय क्रीडा संकुलाच्या घरच्या मैदानावर चारही सामन्यांमध्ये अपराजित राहून दिमाखदारपणे प्रो-कबड्डी लीगच्या गुणतालिकेत अव्वल स्थान टिकवले आहे. यु मुंबाने तिसऱ्या विजयाची नोंद करताना मंगळवारी पाटणा पायरेट्स संघाला ३६-३३ असे पराभूत केले. अनुप कुमार आणि शब्बीर बापू शरफुद्दीन यांच्या चढायांमुळेच मुंबईला हा विजय साकारता आला. पाटणा संघाकडून राकेश कुमारने एकाकी लढत दिली. परंतु त्यांना विजयानिशी हंगामाचा प्रारंभ करण्यात अपयश आले.
यु मुंबा आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामना प्रामुख्याने राकेश कुमार आणि अनुप कुमार या भारताच्या दोन प्रमुख खेळाडूंच्या चढायांमुळे रंगतदार ठरला. मध्यंतराला गुणफलक १९-१९ असा बरोबरीत होता. परंतु उत्तरार्धात यु मुंबा संघाने सोमवारी झालेल्या चुका प्रकर्षांने टाळून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यु मुंबाकडून अनुपने १६ चढायांमध्ये १० गुण घेतले, तर शब्बीरने १८ चढायांमध्ये ८ गुण कमवले. पाटणाकडून राकेशने १९ चढायांमध्ये सर्वाधिक १५ गुण मिळवले. यात ६ बोनस गुणांचा समावेश होता.
सामन्यानंतर राकेश कुमार म्हणाला, ‘‘आमचा बचाव थोडासा कमजोर आहे. पुढील सामन्यांमध्ये आम्ही त्यात सुधारणा करू. काही परदेशी खेळाडूंनाही आम्ही आजमावू शकतो.’’
पाटणाचे प्रशिक्षक रवी खोकर म्हणाले की, ‘‘वसिम सज्जड हा चांगला डावा कोपरारक्षक आहे. आधी आम्ही त्याच्यासोबत सराव करू. त्यानंतरच आम्ही त्याला खेळवू.’’

महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याचा
प्रस्ताव बारगळला
प्रो-कबड्डी लीग या पुरुषांसाठीच्या कबड्डी स्पध्रेच्या काळात महिलांचे प्रदर्शनीय सामने आम्ही घेणार आहोत, अशी घोषणा मशाल स्पोर्ट्सचे प्रमुख चारू शर्मा यांनी केली होती. परंतु ही घोषणा हवेतच विरल्याचा प्रत्यय येत आहे. प्रो-कबड्डी लीग स्पध्रेत सहभागी झालेल्या आठ संघांच्या शहरांमध्ये हे सामने होणार आहेत. प्रत्येक शहरात चार दिवसांत सात सामन्यांची ही आखणी केली आहे. परंतु यांपैकी एका दिवशी फक्त एकच सामना होतो आहे. त्याऐवजी प्रत्येक शहरात एक महिलांचा प्रदर्शनीय सामना घेण्याची संधी संयोजकांना होती. पण ते संयोजकांनी प्रकर्षांने टाळले. काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चनने ज्या वेळी प्रो-कबड्डीमधील संघखरेदी केल्याची घोषणा केली होती, त्या पत्रकार परिषदेत महिलांची प्रो-कबड्डी स्पर्धा केव्हा सुरू होणार, या प्रश्नाला उत्तर देताना शर्मा म्हणाले होते की, ‘‘येत्या काही वर्षांत आम्ही महिलांच्या प्रो-कबड्डी लीगचाही विचार करीत आहोत. परंतु यंदाच्या स्पध्रेदरम्यान आम्ही महिलांचे प्रदर्शनीय सामने खेळवणार आहोत.’’
याबाबत प्रो-कबड्डीच्या संयोजकांनी सांगितले की, ‘‘आम्ही चारपैकी एका दिवशी फक्त एक सामना ठेवल्यामुळे तिकीटदरसुद्धा त्याचप्रमाणे ठेवले आहेत. चारशे आणि दोनशे रुपये हे पहिल्या तीन दिवसांचे तिकीटदर शेवटच्या दिवशी एक सामना असल्यामुळे अध्र्यावर आणले आहेत.’’