युरोपियन देशांमध्ये सर्वोत्तम फुटबॉल संघाचा मान पटकावण्यासाठी महिनाभर सुरू असलेल्या युरो चषक फुटबॉल स्पध्रेत ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघाने बाजी मारली आहे. यजमान फ्रान्सचा पोर्तुगालने १-० असा पराभव करून युरो चषकावर पहिल्यांदाच आपली मोहोर उमटवली. पोर्तुगालचा एडर विजयाचा शिल्पकार ठरला. एडरने सामन्याच्या १०९ व्या मिनिटाला गोल करून संघाला विजय प्राप्त करून दिला.

पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर रंगलेल्या लढतीत पोर्तुगालचे पारडे जड मानले जात होते. त्यात सामन्याच्या सुरूवातीलाच पोर्तुगालला मोठा धक्का बसला होता. रोनाल्डोच्या उजव्या पायाच्या गुडघ्याची दुखापती बळावल्याने त्याला सामन्याच्या २४ व्या मिनिटालाच माघार घ्यावी लागली. क्लब स्तरावर रिअल माद्रिदला अनेक जेतेपदे पटकावून देणाऱ्या या खेळाडूला राष्ट्रीय संघासाठी एकही चषक जिंकता आलेला नव्हता. त्यामुळे ती उणीव भरून काढण्याच्या महत्त्वाकांक्षेने रोनाल्डो मैदानात दाखल झाला होता. मात्र, गुडघ्याची दुखापतीमुळे रोनाल्डोची निराशा झाली होती. रोनाल्डोने सामना सुरू असताना दोनवेळा दुखापतीवर उपचार घेतले होते. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रोनाल्डोला मैदान सोडावे लागले. पुढे संपूर्ण सामना पोर्तुगालला रोनाल्डोविना खेळावा लागला.

दोनही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. सामन्याच्या निर्धारित वेळेत कोणालाही संघाचे खाते उघडता आले नव्हते. फ्रान्सच्या ग्रिझमनने दोनवेळा अप्रतिम प्रयत्न केले होते. मात्र, अपयश हाती आले. तर पोर्तुगालकडून नानी आणि मारिओ यांनाही गोलची संधी होती. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर सामना ०-० असा सुटल्याने अतिरिक्त वेळेपर्यंत सामना लांबला. सामन्याच्या १०९ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या एडरने गोलपोस्टच्या दिशेने अप्रतिम किक मारून शानदार गोल झळकावला आणि स्टेडियमवर एकच जल्लोष सुरू झाला.

पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स सामन्यातील महत्त्वाचे अपड्टेस-

# युरो चषकावर पोर्तुगालची मोहर, एडर ठरला विजयाचा शिल्पकार

# डगआऊटमध्ये रोनाल्डोचाही जल्लोष

# पोर्तुगाच्या एडरने सामन्याच्या १०९ व्या मिनिटाला खाते उघडले, स्टेडियमवर पोर्तुगालच्या चाहत्यांचा जल्लोष.

# अतिरिक्त वेळेच्या पहिल्या पंधरा मिनिटांमध्येही दोनही संघांना खाते उघडण्यात अपयश.

# अतिरिक्त वेळ घेण्यात येणार.

# ९० मिनिटांचा खेळ संपला, पोर्तुगाल ०-० फ्रान्स

# सामन्याच्या ८० व्या मिनिचाला पोर्तुगालच्या नानीकडून गोलसाठी अप्रतिम प्रयत्न, पण फ्रान्सच्या गोलरक्षकाचे उत्तम गोलरक्षण

# पोर्तुगालच्या जे.मारिओला पंचांकडून पिवळे कार्ड.

# फ्रान्सच्या ग्रिझमनचा आणखी एक सुंदर प्रयत्न, मात्र अपयशी

# मघ्यांतरानंतर पुन्हा सामन्याला सुरूवात.

# पोर्तुगाल आणि फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या रोषणाईत न्हाऊन निघालेला पॅरिसमधील सुप्रसिद्ध आयफेल टॉवर.

# सामन्याचा मध्यांतर, पहिल्या ४५ मिनिटांच्या खेळात दोनही संघांना खातं उघडला आलेलं नाही.

# फ्रान्सच्या सिस्कोकडून गोलसाठी उत्तम प्रयत्न, पण यश नाही.

# पोर्तुगालसाठी निराशाजनक बातमी, दुखापत बळावल्यामुळे रोनाल्डो सामन्याच्या २४ व्या मिनिटालाच मैदानाबाहेर. आता रोनाल्डोविना पोर्तुगालला खेळावे लागणार

# उपचारानंतर रोनाल्डो पुन्हा मैदानात दाखल

# ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या डाव्या गुडघ्याला दुसऱयांदा दुखापत. रोनाल्डो पुन्हा उपचारासाठी मैदानाबाहेर

# सामन्याच्या ९ व्या मिनिटालाच फ्रान्सच्या ग्रिझमनकडून शानदार हेडर, पण पोर्तुगालच्या गोलरक्षकाकडून उत्तम गोलरक्षण.

# दोनही संघ लढतीसाठी तयार, पोर्तुगालच्या नानीने फुटबॉलला किकमारून सामन्याला केली सुरूवात

# फ्रान्सच्या राष्ट्रगीताला सुरूवात.

# पोर्तुगालच्या राष्ट्रगीताला सुरूवात.

# दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात दाखल.

# फ्रान्सच्या संघात कोणताही बदल नाही, असा असेल यजमानांचा संघ.

# असा असेल पोर्तुगालचा संघ, संघात पेपे आणि कार्व्हेलोचे पुनरागम.

वाचा: युरोमध्ये हिरो बनण्याची रोनाल्डोला संधी

# स्टेडियमवर दोनही संंघांच्या खेळाडूंचा सराव.

# स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर प्रेक्षकांची तुफान गर्दी.

# संपूर्ण फ्रान्स फुटबॉलमय झालंय.

# फ्रान्सचा संघ स्टेडियमच्या दिशेने रवाना.