भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने धरमशाला कसोटीत केलेल्या भन्नाट गोलंदाजीने सर्वांचेच मन जिंकले. अचूक टप्प्यातील उमेशच्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बिथरलेले पाहायला मिळाले होते. कसोटीच्या तिसऱया दिवशी उमेशने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट्स घेतल्या, तर इनिंग संपताना त्याने आणखी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाचा डाव भारताने १३७ धावांतच गुंडाळला होता.
ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आल्यानंतर आपला सहकारी गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत दिलेल्या मुलाखतीत उमेशने आपल्या रणनितीची माहिती दिली. तो म्हणाला की, ”ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज बाऊन्सर टाकत होते. विशेष करून पॅट कमिन्सची गोलंदाजी आपण पाहिली तर त्याला खेळपट्टीवर चांगली उसळी मिळत असल्याचे मी हेरले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसऱया इनिंगमध्ये जास्तीत जास्त बाऊन्सर टाकण्याचा निर्णय घेतला होता.

 

याबद्दल अधिक माहिती देताना तो म्हणाला की, मालिकेतील निर्णायक सामना असल्याने आम्हाला जिंकणे अपरिहार्य होते. जेव्हा मी फलंदाजीला गेलो होतो तेव्हा मला दोन-तीन चांगले बाऊन्सर आले होते. ड्रेसिंग रुममध्ये परतत असतानाच मी जास्तीत जास्त बाऊन्सर टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण बाऊन्सर टाकताना गोलंदाजीत अधिकचा आक्रमकपणा येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे ठरवले होते. कमिन्सचे बाऊन्सर मी संयमाने खेळताना मैदानात डेव्हिड वॉर्नरने डिवचण्याचा प्रयत्न केला होता. ”बॉल जास्त वेगवान आहे का?” असा खोचक टोला वॉर्नरने लगावला होता, असे उमेश यादवने सांगितले. मग वॉर्नर फलंदाजीला आला तेव्हा मीही बाऊन्सर टाकून जशास तसा प्रश्न त्याला विचारला होता, असेही यादवने सांगितले.