डीआरएस अर्थात पंच फेरआढावा  पद्धतीला नकार देण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगमोहन दालमिया अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर बीसीसीआयच्या कार्यकारिणीत बदल झाले आहेत, मात्र यामुळे पंच फेरआढावा  पद्धतीसंदर्भातील दृष्टिकोनात कोणताही बदल झालेला नाही. सध्याच्या स्थितीत ही पद्धत स्विकारता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने मांडली आहे.
दोन देशांदरम्यानच्या क्रिकेट मालिकेत या पद्धतीला नकार देणारा भारत हा एकमेव संघ आहे. ही पद्धत सर्वागाने अचूक नाही, अशा मतामुळे भारत सहभागी असलेल्या मालिकेत ही पद्धत लागू करण्यात येत नाही. मात्र सध्या सुरू असलेली विश्वचषक स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) आयोजित स्पर्धा असल्याने भारतीय संघाच्या सामन्यातही या पद्धतीचा वापर होऊ शकतो. या पद्धतीतील तंत्रज्ञान अद्ययावत झाल्यास आम्ही फेरविचार करू, मात्र तूर्तास असे झालेले नाही. त्यामुळे पंचपुनर्आढावा पद्धतीविषयी आमचा विचार बदलण्याचा प्रश्नच नाही, असे बीसीसीआयचे नवनियुक्त सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य फेरीच्या लढतीला उपस्थित राहणार आहेत.