भारत-वेस्ट इंडिज अंतिम लढतीत समोरासमोर

अफलातून सांघिक खेळासह युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित राहणारा भारतीय संघ विश्वविजेतेपदापासून केवळ एक विजय दूर आहे. अंतिम लढतीत भारतीय संघासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर चांगली कामगिरी केली आहे. अंतिम लढतीत या कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास, चौथ्यांदा विश्वविजेतेपदाचा चषक उंचावण्याची संधी भारतीय संघाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या नावावर असलेला तीन जेतेपदांचा विक्रम भारतीय संघ मोडू शकतो. भारतीय संघाने याआधी २०००, २००८ आणि २०१२ मध्ये जेतेपदावर नाव कोरले आहे.

ऋषभ पंत आणि इशान किशन ही धडाकेबाज सलामीवीरांची जोडी भारताच्या ताफ्यात आहे. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याला सामोरे जात भक्कम सलामी देण्याची जबाबदारी या जोडीवर आहे. सर्फराझ खानने प्रत्येक सामन्यात उपयुक्त योगदान दिले आहे. अंतिम लढतीत संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी तो आतुर आहे. अनमोलप्रीत सिंगने श्रीलंकेविरुद्ध ७२ धावांची खेळी केली होती. त्याच्याकडूनही संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. अष्टपैलू रिकी भुई आणि महिपाल लोमरुर भारतीय संघासाठी जमेची बाजू आहे. अवेश खान, मयांक डागर या वेगवान गोलंदाजांनी स्पर्धेत दिमाखदार प्रदर्शन केले आहे. भारताचे फिरकीपटू वेस्ट इंडिजसाठी डोकेदुखी ठरू शकतात.

संघ

भारत : इशान किशन (कर्णधार), रिकी भुई, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, सर्फराझ खान, अरमान जाफर, खलील अहमद, झीशान अन्सारी, राहुल बॅथम, मयांक डागर, अमनदीप खरे, अवेश खान, महिपाल लोमरुर, शुभम मावी, अमोलप्रीत सिंग.

वेस्ट इंडिज : श्रिमोन हेटमेयर (कर्णधार), शाहिद क्रुक्स, केसी कार्टी, मायकेल फ्रू, ज्येड गुली, चीमर होल्डर, टेव्हिन इमलाच, अल्झारी जोसेफ, रायन जॉन, क्रिस्टन कालिचरण, गिडरॉन पोप, केमो पॉल, ओडन स्मिथ, शामर स्प्रिंगर, इम्यॅनुअल स्टुअर्ट.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३

वेळ : सकाळी ८.३० पासून