लॉर्ड्सवरील पराभवानंतर ओळीने तीन कसोटी जिंकत इंग्लंडने भारताविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. आम्ही असा शानदार विजय मिळवू, ही कल्पना केली नव्हती, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने व्यक्त केली.
भारताविरुद्धची पाचवी कसोटी एक डाव आणि २४४ धावांनी जिंकल्यानंतर कुक म्हणाला, ‘‘आम्ही जेव्हा ०-१ अशा फरकाने पिछाडीवर होतो, तेव्हा आम्ही कसोटी मालिका जिंकू शकू असे मी म्हटल्याचे मला आठवते. इंग्लंडच्या संघातील गुणवत्ता आणि कौशल्याविषयी मला कमालीचा आत्मविश्वास होता. आम्ही कसोटी मालिका शानदार पद्धतीने जिंकली. हे अनपेक्षित यश आहे.’’
‘‘साऊदम्पटनला नशिबाने कलाटणी घेतली आणि आम्ही तिसरी कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरलो. या विजयानंतर मग आमचा मविश्वास दुणावला,’’ असे त्याने पुढे सांगितले.
संपूर्ण मालिकेत भारतीय संघ जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या गोलंदाजीच्या दडपणाखाली जाणवत होता. याबाबत कुक म्हणाला, ‘‘इंग्लंडच्या यशाचे श्रेय पाचही गोलंदाजांना द्यायला मला आवडेल. अँडरसन, ब्रॉड यांच्याप्रमाणेच मोइन अली, ख्रिस जॉर्डन आणि ख्रिस वोक्स यांनी अप्रतिम गोलंदाजी केली.
पत्नीच्या मतपरिवर्तनामुळे कर्णधारपद सोडले नाही
लंडन : नशिबाला कशी नाटय़पूर्ण कलाटणी मिळाली, हे पाहून इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक भारताविरुद्धच्या कसोटी विजयानंतर भावुक झाला होता. इंग्लंडचा संघ पराभूत होत होता, तेव्हा कर्णधारपद सोडण्याचे विचार मनात डोकावत होते. परंतु पत्नी अ‍ॅलिसेने माझे मतपरिवर्तन केल्यामुळे ते सोडले नाही, असे कुकने सांगितले. ‘‘माझ्या पत्नीमुळेच आता मी कर्णधार म्हणून उभा राहू शकलो. नेहमी तशाच पद्धतीने घडत नाहीत, असे तिने मला सांगितले. मी निराश झालो होतो आणि कर्णधारपद सोडण्याची मानसिक तयारी  करीत होतो,’’ असे भावनिक उद्गार कुकने काढले.