दिमाखदार विजयी सलामी करण्याची अपेक्षा असलेल्या भारतीय संघाला अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत जपानविरुद्ध २-१ अशा निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या व ऑलिम्पिक तिकीट निश्चित केलेला भारतीय संघ जपानवर मोठा विजय मिळवील अशी आशा होती. मात्र जपान संघानेच पहिला गोल करीत भारताला धक्का दिला. त्यांचा हा गोल केनजी किताझातोने १७ व्या मिनिटाला केला. त्यानंतर जागे झालेल्या भारताकडून हरमानप्रितसिंग (२४ वे मिनिट) व कर्णधार सरदारासिंग (३२ वे मिनिट) यांनी गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. भारतीय खेळाडूंनी अनेक संधी वाया घालविल्या. अन्यथा हा सामना त्यांनी किमान पाच गोलांच्या फरकाने जिंकला असता.
जपानकडून नऊ खेळाडूंनी येथील सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. मात्र त्यांनी भारतीय खेळाडूंना जिद्दीने लढत दिली. एकीकडे जपानच्या खेळाडूंनी आक्रमण सुरू ठेवले होते. त्यांना १७ व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत किताझातोने संघाचे खाते उघडले. त्याने भारताचा गोलरक्षक हरज्योतसिंगला चकवीत हा गोल केला. हा गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या चालीत गांभीर्य आले. २४ व्या मिनिटाला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरद्वारा हरमान याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. ३२ व्या मिनिटाला जसजितसिंग खुल्लर याने दिलेल्या पासवर सरदारासिंग याने अप्रतिम गोल केला व संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. भारताची गुरुवारी ऑस्ट्रेलियाबरोबर लढत होणार आहे.
पाकिस्तानने कॅनडावर ३-१ अशी मात करीत विजयी सलामी केली. त्यांच्या या विजयात महंमद अर्सलान कादिर याने केलेल्या दोन गोलांचा मोठा वाटा होता. त्याने २७ व्या व २८ व्या मिनिटाला हे गोल केले. कॅनडाच्या रिचर्ड हिल्ड्रेट याने एक गोल करीत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. मात्र महंमद अर्शद याने ५२ व्या मिनिटाला पाकिस्तानचा तिसरा गोल नोंदवीत संघाची बाजू बळकट केली.

मनप्रीतच्या दु:खात संघ सहभागी
भारतीय संघातील खेळाडू मनप्रीतसिंगच्या वडिलांचे भारतात निधन झाल्यामुळे त्याला मायदेशी रवाना व्हावे लागले. भारताचा जपानविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी काही तास अगोदर मनप्रीतला वडिलांचे निधनाचे वृत्त समजले. त्यामुळे त्याला तातडीने मायदेशी यावे लागले. भारतीय संघातील अन्य खेळाडूंनी मनप्रीतच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली व त्याचे प्रतीक म्हणून हाताला काळी फीत बांधूनच खेळले. भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले, मनप्रीत हा या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात सहभागी होणार नाही. त्याची अनुपस्थिती संघास निश्चितपणे जाणवणार आहे.