नवा कायदा क्रीडा मंत्रालयाकडे विचाराधीन

उत्तेजक द्रव्यांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या विचाराधीन असलेल्या नव्या धोरणानुसार उत्तेजकांचे सेवन केल्यास फौजदारी गुन्हा ठरेल. जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाच्या कायद्यांचा अभ्यास या कारणास्तव करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी उत्तेजक सेवनाच्या गुन्हेगारीकरणाची आवश्यक नसल्याचे म्हटले होते, कारण सध्याच्या व्यवस्थेनुसार हे गुन्हेगार सहज पकडले जातात आणि दोषी आढळल्यानंतर खेळाडूच्या वाटय़ाला योग्य शिक्षा ही येत असते. मात्र गुरुवारच्या गोयल यांच्या विधानात विरोधाभास आढळला. उत्तेजकांचा विळखा झपाटय़ाने मुलांच्या क्रीडा प्रकारांमध्येसुद्धा जाणवत आहे. या खेळाडूंवर जबर भीती असावी, याच उद्देशाने आम्ही या कायद्याचा विचार करीत आहोत, असे गोयल यांनी सांगितले.

‘‘नव्या कायद्यानुसार उत्तेजकांचे सेवन हा फौजदारी गुन्हा ठरून, सदर व्यक्तीला तुरुंगात जावे लागेल,’’ असे गोयल यांनी एका परिसंवादात सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘उत्तेजकांचे वर्चस्व आधी राष्ट्रीय स्पर्धापर्यंत सीमित होते. आता हा धोका विद्यापीठ आणि शालेय क्रीडा स्पर्धामध्येही दिसून येतो आहे. फक्त खेळाडूच नव्हे, तर त्याच्या पाठीशी असणारे प्रशिक्षक, सरावतज्ज्ञ, डॉक्टर यांना त्वरित अटक करून तुरुंगवास होईल.’’

‘‘क्वचितप्रसंगी खेळाडू अजाणतेपणे बंदी असलेल्या उत्तेजकांचे सेवन करतात. प्रशिक्षकांच्या चुकीमुळे खेळाडूंना शिक्षा भोगावी लागते, मात्र प्रशिक्षक मोकळे राहतात. नव्या कायद्यानुसार प्रत्येक जण दोषी ठरेल,’’ असे गोयल यांनी सांगितले. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेचे (नाडा) महासंचालक नवीन अगरवाल म्हणाले की, ‘‘चाचणीचे निकाल योग्य रीतीने लागत आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे सात हजार खेळाडूंच्या चाचण्या होत आहेत.’’

जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार २०१५ मध्ये उत्तेजक सेवन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारत सलग तिसऱ्यांदा तिसऱ्या स्थानावर आहे. त्या वर्षी भारताचे ११७ खेळाडू उत्तेजक सेवनात दोषी सापडले, तर रशिया (१७६) आणि इटली (१२९) हे पहिल्या दोन स्थानांवर होते.