वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स जरी यजमान असले तर इंडियन प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचे गुरुवारच्या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. परंतु मुंबईने कोलकाताविरुद्ध १७-५ अशी विजयी कामगिरी आतापर्यंत राखली असल्यामुळे या सामन्याविषयी भाकीत करणे चुकीचे ठरेल. याशिवाय चालू हंगामातसुद्धा मुंबईने कोलकाताला हरवले आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच मागील चार वर्षांत मुंबई आणि कोलकाता याच संघांकडे जेतेपद असल्यामुळे ही लढत चुरशीची होईल, अशी क्रिकेटरसिकांची अपेक्षा आहे.
कोलकाताने यंदाच्या हंगामातील पाच सामन्यांपैकी चार विजय मिळवले आहेत. मात्र कोलकाताचा एकमेव पराभव हा ईडन गार्डन्सवर मुंबई इंडियन्सविरुद्धच झाला होता. रोहित शर्मानेच त्या विजयाचा अध्याय लिहिताना ५४ चेंडूंत नाबाद ८४ धावांची खेळी साकारली होती.
गौतम गंभीरचे कुशल नेतृत्व आणि सातत्यपूर्ण फॉर्म या बळावर कोलकाता यंदा चांगली कामगिरी बजावत आहे. गंभीरच्या खात्यावर पाच सामन्यांत २३७ धावा जमा आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यात १६० धावसंख्या पार करताना कोलकाताला झगडावे लागले होते, मात्र तरीही त्यांनी दोन विकेट्स राखून विजय मिळवला होता. मुंबईचा रणजीपटू सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंत काढलेल्या ६० धावांचा त्यात सिंहाचा वाटा होता. याशिवाय युसूफ पठाणचेही ३६ धावांचे योगदान होते.
‘‘आयपीएल अद्याप मध्यावरसुद्धा आलेली नाही. आतापर्यंतची यशस्वी कामगिरी पुढेसुद्धा कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. मागील वर्षी काय घडले, याची आम्हाला चांगलीच जाणीव आहे. १२व्या सामन्यापर्यंत कोलकाताचा संघ गुणतालिकेत आघाडीवर होता. मात्र अचानक सारे पालटले आणि आम्ही प्ले-ऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलो,’’ असे गंभीरने काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात संमिश्र यश मिळत आहे. विजय आणि पराभवाचा चढ-उतार सुरूच आहे. मात्र सोमवारी मोहालीत किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध मिळवलेला विजय हा मुंबईचा आत्मविश्वास उंचावणारा आहे. त्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा भोपळा फोडण्यातही अपयशी ठरला, मात्र सलामीवीर पार्थिव पटेलने ८१ धावांची लाजवाब खेळी साकारल्यामुळे मुंबईला ६ बाद १८९ असे आव्हान उभे करता आले. मागील तीन सामन्यांपैकी हा मुंबईचा दुसरा विजय होता. त्यामुळे ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचले. मात्र बाद फेरीचा टप्पा गाठण्यासाठी अजून बराच पल्ला त्यांना गाठायचा आहे.
फलंदाजीच्या बाबतीत मुंबईची मदार बहुतांशी रोहित आणि अंबाती रायुडू (२१७ धावा) यांच्यावर आहे. किरॉन पोलार्ड आणि जोस बटलर हे वेळप्रसंगी हिमतीने किल्ला लढवतात. गोलंदाजीत लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा मिचेल मॅक्क्लिनॅघन (११ बळी) आणि जसप्रीत बुमराह (८ बळी) यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये हरभजन सिंगला आतापर्यंत फक्त तीन बळी मिळाले आहेत, मात्र कोलकाताविरुद्ध त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.
कोलकाताकडून गंभीरला तोलामोलाची साथ सलामीवीर रॉबिन उथप्पा (१३४ धावा) याच्याकडून मिळत आहे. वानखेडेवर मुंबईला सूर्यकुमारपासूनसुद्धा धोका संभवतो. कोलकाताकडे ताकदीचा गोलंदाज नाही, हे सत्यसुद्धा नाकारता येणार नाही. परंतु मॉर्ने मॉर्केल आणि उमेश यादव यांच्यासारखे गोलंदाज मुंबईविरुद्ध चांगला प्रतिकार करू शकतील. पीयूष चावला आणि शकिब अल हसनच्या साथीला सुनील नरिन परतल्यामुळे कोलकाताची ताकद वाढली आहे. कोलकाताला वेगवान गोलंदाज जॉन हॅस्िंटग्सची उणीव तीव्रतेने भासणार आहे.
वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.