ऑलिम्पिकमध्ये अठरा सुवर्णपदके जिंकणारा मायकेल फेल्प्स हा जागतिक जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार नसला तरीही अमेरिकन जलतरण महासंघ त्याला स्पर्धेतील सहभागासाठी आग्रही आहे. ही स्पर्धा २४ जुलैपासून रशियातील कझान येथे आयोजित केली जाणार आहे.
महासंघाचे कार्यकारी संचालक चुक विएलगुस यांनी सांगितले, फेल्प्स याच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली आहे. या स्पर्धेसाठी आवश्यक असणारी तयारी त्याने सुरू केलेली नाही. तरीही स्पर्धेसाठी अजून भरपूर वेळ आहे व दोनतीन महिन्यांच्या सरावाच्या जोरावर सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
अतिरिक्त मद्यपान करीत मोटार चालविल्याबद्दल फेल्प्स याच्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. बंदीची ही मुदत पुढील महिन्यात संपत आहे. मात्र जागतिक स्पर्धेत आपण सहभागी होणार नसल्याचे त्याने यापूर्वीच जाहीर केले होते.
विएलगुस म्हणाले, फेल्प्सच्या सहभागासाठी राष्ट्रीय संघाचे संचालक फ्रँक बुश व कार्यकारी समितीद्वारे सविस्तर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
फेल्प्सने तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेत १८ सुवर्णपदकांसह एकूण २२ पदकांची कमाई केली आहे. २०१२च्या ऑलिम्पिकनंतर त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र पुन्हा त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी तो उत्सुक आहे. त्याआधी त्याने जागतिक स्पर्धेत कौशल्याची चाचणी घ्यावी असे मत येथील काही संघटकांनी व्यक्त केले आहे.
फेल्प्सने जागतिक स्पर्धेसाठी १०० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या शर्यतींचे  पात्रता निकष पूर्ण केले आहेत. तसेच तो रिले शर्यतीतही भाग घेण्याची शक्यता आहे. मिस कॅलिफोर्निया असलेली निकोली जॉन्सन हिच्याशी नुकताच त्याचा साखरपुडाही झाला आहे.