ऑलिम्पिकपटू विष्णु वर्धन याने बेल्जियमच्या यान्निक रॉटर याच्यावर ७-६ (७-५), ६-७ (६-८), ६-३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवित केपीआयटी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत शानदार सलामी केली. जर्मनीच्या रिचर्ड बेकर यानेही विजयी प्रारंभ केला. शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुख्य फेरीस सोमवारी प्रारंभ झाला. बेकर याने जपानच्या यासुतका उचीयामा याचे आव्हान ७-५, ६-१ असे संपुष्टात आणले. बेकर याने दुहेरीत अ‍ॅलेक्झांडर कुद्रत्सेव याच्या साथीत चौथ्या मानांकित आद्रियन मेनेन्डेझ व अ‍ॅलेक्झांडर नेदायसेव यांचा ६-४, ४-६, १०-७ असा पराभव केला. भारताच्या सोमदेव देववर्मन याने एन.विजय सुंदर याच्या साथीत व्ही.एम.रणजित व श्रीराम बालाजी यांच्यावर ६-२, ६-३ असा सहज विजय मिळविला. लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेस याच्या साथीत खेळण्याची संधी वर्धन याला मिळाली होती. राष्ट्रीय विजेता वर्धन याने दुखापतीमुळे गेले चार महिने स्पर्धात्मक टेनिसपासून विश्रांती घेतली होती. त्याला येथे विशेष प्रवेशिकेद्वारे संधी देण्यात आली.