वसई-विरार महानगरपालिकेतर्फे रविवारी होणाऱ्या चौथ्या वसई-विरार मॅरेथॉन शर्यतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल १४ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षी पुरुषांच्या मॅरेथॉनचे जेतेपद पटकावणाऱ्या संवरू यादवसह विनोद कुमार, विकास कुमार, नीरज पाल, राधेकुमार हे देशातील अव्वल धावपटू या शर्यतीत धावणार आहेत. बिनिंग लिंगखोई व एलाम सिंग यांनी मुंबई मॅरेथॉन शर्यतीद्वारे ऑलिम्पिकचे पात्रता निकष पार करण्यासाठी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत भारताची अव्वल धावपटू कविता राऊत, सुधा सिंग यांच्यासह विजयमाला पाटील, रोहिणी राऊत यांच्यात जेतेपदाची चुरस असेल.
पूर्ण मॅरेथॉनमध्ये जवळपास ५०० धावपटू सहभागी होणार असून अर्धमॅरेथॉनमध्ये ४ हजारांपेक्षाही अधिक स्पर्धत धावणार आहेत. हौशी धावपटूंना आकर्षित करण्यासाठी या वर्षीपासून पहिल्यांदाच ठेवण्यात आलेल्या ११ किमीच्या शर्यतीत २३०० जण तर ज्युनियर गटांमध्ये ८००० जण धावपटू सहभागी होणार आहेत. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये तगडी स्पर्धा रंगणार असून जवळपास २० एलिट अ‍ॅथलिटमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे. जी. लक्ष्मणन, खेता राम, सोजी मॅथ्यू, जतिंदर सिंग, संदीप कुमार आणि बी. सी. तिलक यांच्यात जेतेपदासाठी आव्हान असणार आहे. पूर्ण मॅरेथॉनमधील विजेत्याला दोन लाखांचे तर अर्धमॅरेथॉनमधील विजेत्याला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. थंड वातावरण आणि शर्यतीची वेळ लवकर करण्यात आल्यामुळे स्पर्धाविक्रम नोंदवला जाण्याची शक्यता आहे.