जेके टायर मोटार रेसिंग शर्यतींच्या मालिकेत यंदा व्हेन्टो चषक स्पर्धाचा समावेश केला जाणार आहे. स्पर्धेबरोबरच मोटार शर्यतींसाठी नैपुण्य शोध व विकासावरही भर दिला जाणार आहे. 

फोक्सव्ॉगन मोटारस्पोर्ट्सचे प्रमुख शिरीष व्हिस्सा यांनी ही माहिती दिली. या वेळी जेके टायर मोटार रेसिंगचे प्रमुख संजय शर्मा हेही या वेळी उपस्थित होते. व्हिस्सा म्हणाले,‘‘ फोक्सव्ॉगनतर्फे गेली पाच वर्षे पोलो चषक स्पर्धाची मालिका आयोजित केली जात आहे. या स्पर्धेद्वारे अनेक युवा स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी उत्तम व्यासपीठ मिळाले. या स्पर्धेचे नूतनीकरण होऊन ती आता व्हेन्टो चषक नावाने ओळखली जाणार आहे. ही स्पर्धा जून ते नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी कनिष्ठ, व्यावसायिक व वरिष्ठ असे तीन गट राहणार आहेत. प्रत्येक गटाकरिता २० ते २४ स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी फेब्रुवारीत निवड चाचणी घेतली जाणार आहे. गो कार्टिग स्पर्धेद्वारे ही निवड केली जाईल. निवड झालेल्या स्पर्धकांना वर्षभर नियमित प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोटाररेसिंगच्या कौशल्याबरोबरच शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, एकाग्रता आदीबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे. एकाच प्रकारच्या वाहनाचा उपयोग या स्पर्धेत होत असल्यामुळे वाहनाऐवजी स्पर्धकांच्या कौशल्यावर येथे भर दिला जात असतो.’’
शर्मा म्हणाले,की पोलो चषक स्पर्धेद्वारे फोक्सव्ॉगन स्पोर्ट्सने देशाला अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पर्धक मिळवून दिले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये १४ ते १८ वर्षे वयोगटातही विपुल प्रमाणात नैपुण्य दिसून येत आहे. त्यामुळेच यंदाच्या शर्यतींमध्ये विलक्षण चुरस पाहावयास मिळणार आहे. गेल्या पाच वर्षांप्रमाणेच व्हेन्टो चषक स्पर्धा युवा चालकांसाठी अव्वल दर्जाचे व्यासपीठ ठरणार आहे. मुंबईचा आंतरराष्ट्रीय स्पर्धक अमेय वालावरकर याने आपल्या कारकीर्दिचे श्रेय पोलो चषक स्पर्धेस देत असल्याचे सांगितले. या स्पर्धामध्ये पूर्णपणे चालकांच्या कौशल्यास अधिक संधी असल्यामुळे या स्पर्धाचा आम्हा युवा खेळाडूंना खूप फायदा झाला आहे.
चेन्नईचा चालक कार्तिक थरानी म्हणाला, ‘‘पोलो चषक स्पर्धाच्या मालिकेत भाग घेत असताना मला एका अपघातास सामोरे जावे लागले होते. तथापि संयोजकांनी तत्परतेने माझ्यावरील उपचारांची व्यवस्था केली, त्याचबरोबर त्यांनी पुन्हा चांगले प्रशिक्षण मिळण्याची सुविधाही उपलब्ध केली. त्यामुळेच मला या स्पर्धेत अव्वल यश मिळविता आले.’’