सध्याच्या भारतीय क्रिकेट संघासाठी गोलंदाजी ही मुख्य समस्या निर्माण झाल्याने भारताला आगामी विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद राखणे कठीण जाणार असल्याचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटले आहे.  
गावसकर म्हणतात, भारताने आपल्या गोलंदाजीत महत्वपूर्ण सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा विश्वचषक गमाविण्यास तयार रहावे. न्यूझीलंडमध्ये भारताच्या पराभवाला
संघाची सुमार गोलंदाजीच कारणीभूत आहे. दुसऱया बाजूला न्यूझीलंडचे गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना, भारतीय गोलंदाजांना मात्र साजेशी कामगिरी करता येत नाही. दक्षिण आफ्रिका दौऱयातही गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे येत्या वर्षभरात भारताची गोलंदाजी न सुधारल्यास विश्वचषक आपल्याकडे राखणे कठीण जाईल असेही गावसकर म्हणाले.
एकदिवसीय मालिकांमध्ये पराभवाचेच पाढे भारतीय संघ रचत असल्याने आंतराष्ट्रीय क्रमवारितील अव्वल स्थानही भारताला गमवावे लागले आहे. आगामी विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार असल्याने याठिकाणी भारताची कामगिरी चांगली होणे अपेक्षित होते. परंतु, सध्याच्या स्थितीनुसार भारतीय संघाची कामगिरी राहीली तर विश्वचषकाचे जेतेपद गमवावे लागेल.