सचिन रमेश तेंडुलकर, ही अकरा अक्षरे क्रिकेट विश्वाला अकरा खेळाडूंसारखी वाटायची, एवढा त्याचा दरारा होता आणि त्याचा तेवढाच सन्मानही केला जायचा. कारण विश्वविक्रमांच्या एव्हरेस्टवर पोहोचल्यावरही त्याचे पाय जमिनीवरच होते, पण वर्षांच्या मावळतीला एकदिवसीय क्रिकेटमधून हा तारा निखळला आणि क्रिकेट जगतावर आभाळ कोसळलं. त्याची अशी निवृत्ती बऱ्याच जणांना पटली नाही, या राजहंसाने विहार करतच अलविदा करायला हवा होता, असं काही जणांचं मत होतं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत त्याने क्रिकेट जगताबरोबरच भारतीय क्रिकेटला जोरदार धक्का दिला. त्याचं असं निवृत्ती घेणं चटका लावणारं असलं तरी त्याच्या अनुपस्थितीत खेळणं संघासाठी एक आव्हानच असेल. तसं या वर्षांत संघाची कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये नक्कीच चांगली झालेली नाही, ट्वेण्टी-२०मध्ये भारताने काही नेत्रदीपक कामगिरी केलेली नाही. एकंदरीत भारताने विश्वविजयाची लाज आणि दरारा या वर्षी घालवला हे मात्र नक्की.
वर्षांची सुरुवातच भारताची पराभवाने झाली. ऑस्ट्रेलियातल्या कॉमनवेल्थ बँक सीरिजमध्ये भारताला पहिल्याच सामन्यात यजमानांनी धक्का दिला. एकूण आठ सामन्यांमध्ये भारताने तीन सामने जिंकले आणि एक सामना टाय झाला. अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेने भारतापुढे ३२० धावांचे आव्हान ठेवले होते, भारताला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी हे आव्हान ४० षटकांमध्ये पूर्ण करायचे होते. विराट कोहलीच्या नाबाद १३३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने हे आव्हान ३६.४ षटकांत पूर्ण केले खरे, पण अंतिम फेरीत मात्र गुणांच्या जोरावर ऑस्ट्रेलियासह श्रीलंकेने बाजी मारली. या मालिकेचे वैशिष्टय़ म्हणजे भारताने यामध्ये ‘रोटेशन पॉलिसी’चा अवलंब केला. रोहित शर्मासारख्या युवा फलंदाजाला संधी मिळावी यासाठी धोनीने सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांना एकाही सामन्यात एकत्र खेळवले नाही. या तीनपैकी दोन सलामीवीरांनिशी संघ मैदानात उतरायचा.
आशिया चषक भारताबरोबरच क्रिकेट जगतासाठीही ऐतिहासिक ठरला, कारण मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यजमान बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय कारकिर्दीतले ४९वे शतक झळकावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००व्या शतकाला गवसणी घातली. यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा भारतापुढे समीकरण ठेवण्यात आले, पुन्हा एकदा विराट कोहलीच्या १८३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने हे समीकरण सोडवलेही, पण अंतिम फेरीत पोहोचण्यात भारत नापासच ठरला. कोहलीची ही दुसरी शतकी खेळी भारताला अंतिम फेरीत नेऊ शकली नाही. पण त्याच्या या दोन्ही खेळी अफलातून होत्या. आशिया चषक स्पर्धेतील १८३ धावांच्या खेळीच्या वेळी शतक ओलांडेपर्यंत कोहली जास्त आक्रमक नव्हता, पण शतक ओलांडल्यावर मात्र एक अद्भुत कोहलीचं दर्शन झालं. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर आक्रमण केलं, अगदी प्रत्येक षटकात तो एखाद-दुसरे चौकार सहज ठोकत होता, पण यातला एकही फटका त्याने हवेतून मारला नाही. भारत पुन्हा एकदा अंतिम फेरी न गाठता मायदेशात परतला. ऑस्ट्रेलियातील वादाचा फटका आशिया चषकात बसला तो वीरेंद्र सेहवागला. भांडणं चव्हाटय़ावर आणल्याबद्दल सेहवागला आशिया चषकातून वगळण्याचा/ विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑस्ट्रेलिया आणि आशिया चषकातील निराशेनंतर भारताचा संघ श्रीलंकेत एकदिवसीय सामन्यांसाठी गेला आणि लंकादहन करूनच ते मायदेशी परतले. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ४-१ अशी सहज जिंकली, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी हा एकमेव आनंदाचा क्षण होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये या वर्षी सर्वाधिक ३३ सामने श्रीलंकेचा संघ खेळला, पण त्यांना फक्त १४ सामन्यांमध्येच विजय मिळवता आला. इंग्लंडची कामगिरी या वर्षी नेत्रदीपक अशीच होती, कारण १५ सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल १२ सामने जिंकले होते. भारताने या वर्षी १६ सामने खेळले, पण त्यापैकी त्यांना फक्त ९ सामनेच जिंकता आले. या वर्षांत सर्वाधिक धावा श्रीलंकेच्या कुमार संगकाराने काढल्या, त्याने ३१ सामन्यांमध्ये ११८४ धावा केल्या, पण कोहलीने १६ सामन्यांमध्ये १०२६ धावा करत सर्वाचीच मने जिंकली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये लसिथ मलिंगाने ३२ सामन्यांमध्ये सर्वाधिक ४७ बळी मिळवण्याचा करिश्मा केला, तर अव्वल दहामध्ये स्थान पटकावणे एकाही भारतीय गोलंदाजाला जमले नाही. भारतातर्फे इरफान पठाणने सर्वाधिक १९ बळी मिळवले.
ट्वेण्टी-२० क्रिकेटमध्येही भारताची कामगिरी चांगली झालेली नाही. ऑस्ट्रेलियातील मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. जोहान्सबर्गला झालेला एकमेव सामना दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ-लुईस नियमांनुसार जिंकला. कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेला नमवले. पण इंग्लंडविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीतच सुटली. या वर्षी झालेल्या विश्वचषकात भारताची कामगिरी नक्कीच लौकिकाला साजेशी नव्हती. साखळी फेरीत भारताने कच्चालिंबू अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना पराभूत करत ‘सुपर एट’मध्ये स्थान मिळवले. ‘सुपर एट’मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पालापाचोळा केला, पण भारताने पाकिस्तानला नमवून आपले आव्हान कायम ठेवले. अखेरच्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेला १२१ धावांमध्ये गारद ठेवण्याचे आव्हान होते, पण भारतीय संघ पुन्हा एकदा समीकरणात नापास ठरला.
वेस्ट इंडिजने कॅरेबियन करिश्मा दाखवत ट्वेण्टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. अंतिम फेरीत त्यांच्यापुढे यजमान श्रीलंकेचे आव्हान होते, पण वेस्ट इंडिजने चाणाक्ष खेळ करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
यंदाच्या वर्षांत भारतीय संघ खरं तर नापासच ठरलेला पाहायला मिळाला, मग ते एकदिवसीय क्रिकेट असो किंवा ट्वेण्टी-२०. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॉमनवेल्थ बँक सीरिज आणि आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचायला भारताला जमले नाही, तर ट्वेण्टी-२० विश्वचषकातही भारतीय संघ लौकिकाला साजेसा खेळला नाही. सध्याचा संघाचा फॉर्म, सचिनची अनुपस्थिती, संघातील वादविवाद या साऱ्या गोष्टींवर नजर फिरवता भारतीय संघासाठी नक्कीच आव्हानात्मक असेल.