सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिवांना हटविण्याचा दिलेला निर्णय हा क्रिकेटचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती लोढा यांनी दिली. यासोबतच सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश इतर क्रीडा संघटनांनाही लागू व्हावा, असे मत देखील लोढा यांनी यावेळी व्यक्त केले.
लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी न केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सोमवारी झालेल्या सुनावणीत बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली. कोर्टाच्या निकालानंतर लोढा म्हणाले की, प्रशासक येतील आणि जातील, पण कोर्टाने आज दिलेला निर्णय क्रिकेटसाठी फायद्याचा आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेला निकाल हा क्रिकेटचा विजय आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचे बीसीसीआयने पालन करायला हवे होते. यानंतर क्रिकेटसोबतच इतर क्रीडा संघटनांना देखील सुप्रीम कोर्टाचा आदेश लागू व्हावा, अशी इच्छा असल्याचेही लोढा म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन करण्यात चालढकल केल्याने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. तसेच कोर्टात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? यावर कारणे दाखवा नोटीस देखील कोर्टाने दोघांना दिली आहे. बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱयांची नाव सुचविण्यासाठी कोर्टाने कायदेतज्ज्ञ फली नरिमन आणि गोपाल सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी होणार आहे.

वाचा: सुप्रीम कोर्टाकडून अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची ‘विकेट’, पदावरून हटवले