खोलवर चढाया व उत्कृष्ट पकडी असा अष्टपैलू खेळ करीत बंगळुरू बुल्स संघाने प्रो कबड्डी लीगमध्ये तेलुगू टायटन्स संघावर ३५-२१ असा सफाईदार विजय मिळवला.
सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये चुरस होती. दोन्ही संघांनी पहिल्या सत्रात बचावात्मक खेळावर भर दिला. मध्यंतराला बंगळुरूकडे ११-९ अशी आघाडी होती. उत्तरार्धात बंगळुरूला सूर गवसला. त्यांनी आक्रमक खेळ करीत तेलुगू संघाच्या खेळाडूंना फारशी संधी दिली नाही. २३व्या मिनिटाला त्यांनी पहिला लोण नोंदवला. ३४व्या मिनिटाला त्यांच्याकडे २६-१७ अशी आघाडी होती. तेलुगू संघाच्या खेळाडूंनी काही अंशी पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगळुरू संघाच्या अजय ठाकूरने एकाच चढाईत तीन गडी बाद करीत संघाचे अधिक्य पुन्हा वाढवले. ३७व्या मिनिटाला बंगळुरूने २७-१९ अशी आघाडी मिळवली होती. शेवटच्या मिनिटाला त्यांनी आणखी एक लोण चढवला व सहज विजय मिळवला. बंगळुरूकडून मनजित चिल्लरने पकडीत ८ गुण मिळवले तर चढाईत एक गुणाची कमाई केली. अजय ठाकूरने ९ (२ बोनस) गुण मिळवले. तेलुगूकडून प्रशांत राय व संदीप यांनी प्रत्येकी चार गुण नोंदवले.
पाटणाची दिल्लीवर दबंगगिरी
धारदार पकडींबरोबर अचूक चढायांच्या जोरावर पाटणा पायरेट्स संघाने दिल्ली दबंग संघावर ३९-२२ असा सफाईदार विजय मिळवला. पाटणाकडून दीपक नरवालने अष्टपैलू खेळ केला तर रवी दलालने चढायांमध्ये व संदीप नरवालने पकडीत त्याला यथार्थ साथ दिली. दिल्लीच्या काशिलिंग आडकेला चढाईत मर्यादित यश लाभले, तर पकडीत रवींदर पहाल हा देखील अपयशी ठरला.
प्रो कबड्डीच्या प्रेक्षकसंख्येत लक्षणीय वाढ
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या प्रेक्षकसंख्येत पहिल्या हंगामाच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. १८ जुलैला यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना गतविजेते जयपूर पिंक पँथर्स आणि यु मुंबा यांच्यात झाला. या सामन्याला मागील वर्षीच्या सलामीच्या सामन्यापेक्षा ४५ टक्के अधिक प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. पहिल्या आठवडय़ात एक कोटी एक लाख प्रेक्षकांनी प्रो कबड्डीचा आनंद लुटला.
आजचे सामने
दबंग दिल्ली वि. यू मुंबा
पाटणा पायरेट्स वि. पुणेरी पलटण
वेळ : रात्री ७.५० वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-२ आणि ३, स्टार स्पोर्ट्स एचडी-२ आणि ३, स्टार गोल्ड हिंदी