अनुभवी सलामीवीर फैज फझल आणि गणेश सतीशच्या दमदार शतकांच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्राविरुद्धच्या रणजी चषक सामन्यात आज दिवसअखेर ३ गडी गमावत ३५२ धावा झळकावल्या.
नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा कर्णधार एस. बद्रिनाथचा निर्णय सार्थकी ठरवत फझल-सतीश या जोडीने संघाला सुस्थितीत नेले. विदर्भातर्फे प्रथम श्रेणी क्रिकेट स्पध्रेत पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय सचिन कटारियाला पहिल्याच सामन्यात धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या सचिनने ४१ चेंडूंत ७ धावा केल्या. सचिन बाद झाल्यानंतर फझल आणि गणेश सतीश या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी खेळपट्टीवर तळ ठोकला व सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा समाचार घेत दोघांनीही शतके ठोकली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २१७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७९ चेंडूंत १३ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने १०७ धावा करणारा फैज मकवानाच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर सतीशने कर्णधार बद्रिनाथसह तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. २३१ चेंडूंत १६७ धावांची खेळी करणाऱ्या सतीशला फिरकी गोलंदाज जयदेव शाहने यष्टिरक्षक जोगियानीकरवी झेलबाद केले. सतीशने ३१८ मिनिटांच्या आपल्या खेळीत १६ चौकार व २ षटकार हाणले.
दिवसअखेर कर्णधार बद्रिनाथ व शलभ श्रीवास्तव अनुक्रमे ६२ व ४ धावांवर खेळत होते. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव शाहने आज स्वत:सह आठ गोलंदाजांचा वापर केला. मकवाना व शाह यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.