श्रीलंकेविरुद्ध कोलंबोच्या मैदानात खेळवण्यात आलेला एकमेव टी-२० सामना भारतीय संघाने जिंकला. या दौऱ्यात कसोटी, वन-डे आणि टी-२० असे सर्व सामने जिंकत भारताने श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मात्र टी-२० सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान झालेला एक सावळा गोंधळ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसतोय.

अवश्य वाचा – एक टी-२० आणि १२ विक्रम, कोलंबोच्या मैदानात भारतीयांचा जलवा

पावसाने व्यत्यय आणल्यामुळे सामना जवळपास ४५ मिनिटे उशीराने सुरु झाला. यावेळी ‘सोनी सिक्स’ या वाहिनीकडून अधिकृत सूत्रसंचालन करणाऱ्या भारताचा माजी खेळाडू मुरली कार्तिकने दोन्ही कर्णधार आणि सामनाधिकाऱ्यांची ओळख करुन दिली. नाणेफेकीदरम्यान कर्णधार विराट कोहलीने हेड्स असं उच्चारण केलं. मात्र प्रत्यक्षात टेल्स असा कौल आल्याचं सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी जाहीर केलं. मात्र मुरली कार्तिक आणि सामनाधिकारी पायक्रॉफ्ट या दोघांच्या संवादातील गोंधळामुळे मुरली कार्तिकने हेड्स कौल समजून विराटने नाणेफेक जिंकल्याचं जाहीर केलं.

या नाणेफेकीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, पण या व्हिडिओत पायक्राफ्ट आणि मुरली कार्तिक यांच्यातला संवाद हा निटसा ऐकू येत नाहीये. तसेच या घटनेसंदर्भात आयसीसीची अधिकृत भूमिका अजूनही समजू शकली नाही.विराट कोहलीच्या ८२ धावा आणि मनिष पांडेने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करुन केलेलं अर्धशतक या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धचा टी-२० सामना ७ गडी राखून जिंकला. मात्र नाणेफेकीदरम्यान झालेला हा सावळा गोंधळ सोशल मीडियावर अजुनही चांगला रंगताना दिसतोय.