विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या विदित गुजराथीने आठव्या फेरीत शानदार विजय मिळवत जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत आपले आव्हान राखले. मुलींमध्ये पद्मिनी राऊत, इव्हाना फुर्टाडो व पी. व्ही. नंदिता यांना पराभवाचा धक्का बसला.
या स्पर्धेत विदितने क्रोएशियाच्या माटेझ ब्लाझेकवर ३४ चालींमध्ये मात केली. त्याचे आता ५ गुण झाले आहेत. सातव्या फेरीतील आघाडीवीर कोरी जॉर्जला अर्मेनियाच्या कॅरेन ग्रिगोरियानकडून पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या अरविंद चिदंबरमने रशियाचा ग्रँडमास्टर ओपरीन ग्रिगोरीला बरोबरीत रोखून धक्का दिला. त्याचे आता ५.५ गुण झाले आहेत. सुनील नारायणची अपराजित्वाची मालिका मात्र खंडित झाली. त्याला चीनच्या वेई येईने हरविले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत ७९ चालींपर्यंत सुनीलने झुंज दिली, मात्र डावाच्या शेवटी त्याला आपल्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही.
मुलींमध्ये आघाडीवर असलेल्या पद्मिनीला अव्वल दर्जाची खेळाडू अ‍ॅलेक्झांड्रा गोर्याश्किनाने हरविले. केवळ ३४ चालींमध्ये अ‍ॅलेक्झांड्राने हा डाव जिंकला. इराणच्या सारस्दात खादेमालशेरीने इव्हाना फुर्टाडोवर ३३ चालींमध्ये विजय मिळविला. त्या तुलनेत नंदिताने रुमानियाच्या गेलीप लोआनाला कडवी लढत दिली. चुरशीने झालेला हा डाव लोआनाने ७७ व्या चालींमध्ये जिंकला.