राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेता विकास गौडा व रौप्यपदक विजेती सीमा अंतील पुनिया या दोन्ही थाळीफेकपटूंची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघातर्फे शिफारस करण्यात आली आहे. देशाच्या क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
गौडा याची दुसऱ्यांदा या पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. त्याने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. गतवर्षी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने संभाव्य विजेत्यांची नावे तयार केली होती. त्यामध्ये गौडा याचा समावेश होता. गौडा व सीमा यांच्याबरोबरच पॅरा ऑलिम्पिकपटू एच.एन.गिरिशा व जागतिक स्पर्धेतील भालाफेकीत सुवर्णपदक विजेता देवेंद्र झाझरिया यांची खेलरत्नसाठी शिफारस केली आहे. झाझरिया याची राजस्थान सरकारनेही शिफारस केली आहे. गिरिशा याला सध्या बंदी असलेल्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीची शिफारस आहे.
सीमा हिने आशियाई स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती. अ‍ॅथलेटिक्स महासंघाने सीमा हिच्यासह एम.आर.पुवम्मा, अर्पिदरसिंग व ओ.पी.जैशा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
झाझरिया याने २००४ मध्ये अथेन्स येथील पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
गतवर्षी अर्जुन पुरस्कार मिळविणाऱ्या गिरिशा याने २०१२ च्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत रौप्यपदक मिळविले होते.