ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेतून महिला कुस्तीपटू अपात्र; अन्य खेळाडूही अपयशी

पहिल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पध्रेत भारताला नाचक्कीचा सामना करावा लागला. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटला वजन वाढल्यामुळे स्पध्रेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर इतर स्पर्धकांनाही रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यात अपयश आले. ४८ किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशचे वजन ४०० ग्रॅमने वाढले, त्यामुळे तिला स्पध्रेतून अपात्र ठरविण्यात आले,’’ अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघातील (डब्लूएफआय) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विनेशवरील या कारवाईमुळे रिओ ऑलिम्पिक स्पध्रेत ४८ किलो वजनी गटाची पात्रता मिळवण्याचे भारताचे स्वप्न तूर्तास लांबणीवर पडले आहे. ६ ते ८ मे या कालावधीत टर्कीमध्ये होणाऱ्या दुसऱ्या जागतिक पात्रता स्पध्रेतून रिओचे स्वप्न पूर्ण करण्याची एकमेव संधी भारताकडे आहे. विनेश व तिच्या प्रशिक्षकांना कडक ताकीद देण्यात आली आहे.

‘‘ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित करण्याची एक संधी गमावल्यामुळे विनेश व तिचे प्रशिक्षक यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. विनेशकडून अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्यामुळे, तिला केवळ ताकीद देण्यात आली आहे,’’ असे सूत्रांकडून समजते.

विनेशने डब्लूएफआयकडे आणखी एका संधीची विनंती केली आहे. तसेच टर्कीमध्ये होणाऱ्या स्पध्रेत ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करण्याची ग्वाही तिने दिली आहे. या स्पध्रेत २०० टक्के योगदान देण्याची ग्वाही विनेशने दिली आहे, परंतु त्यात अपयशी ठरल्यास तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. मात्र विनेशऐवजी इतर कुस्तीपटूला पाठवण्यात का येऊ नये, असा प्रश्न विचारला असता ते अधिकारी म्हणाले, ‘‘विनेश व अन्य खेळाडूंमध्ये बराच फरक आहे आणि आयत्या क्षणाला व्हिसा मिळवणेही शक्य नाही. तसेच ऑलिम्पिकसाठीच्या खेळाडूंच्या मुख्य गटात विनेशचा समावेश आहे.

दरम्यान, बबिता फोगट (५३ किलो), गीता फोगट (५८ किलो), अंकिता (६३ किलो), नवज्योत कौर (६९ किलो) व ज्योती (७५ किलो) यांनाही पदकाच्या शर्यतीतून बाद व्हावे लागल्याने त्यांचाही ऑलिम्पिक प्रवेश लांबणीवर पडला आहे.