भारतीय संघाला विजयाची सवय लागली आहे, असे म्हटल्यास कदाचित वावगे ठरणार नाही. दुबळा वेस्ट इंडिज, झिम्बाब्वेकडून पराभव पत्करुन आत्मविश्वास गमावलेला श्रीलंका आणि आता एकेकाळी जगजेत्ता म्हणून मिरवणारा ऑस्ट्रेलियन संघ भारतासमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. चांगल्या क्रिकेट जाणकाराला जर भारताच्या विजयाचं रहस्य विचारल तर तो यशाच मोजमाप करण्यास गडबड करु नये, असा सल्ला देईल. कोणी सांघिक कामगिरीवर भर देईल. तर कोणी निवड समितीनं नव्या चेहऱ्यांना दिलेल्या संधीला श्रेय देईल. अर्थात भारताला क्रिकेटच्या मैदानात मिळणाऱ्या सातत्यपूर्ण यशाच एक उत्तर मिळणं अशक्य आहे.

पण नेटिझन्सने या प्रश्नाचं उत्तर शोधल्याच दिसतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणारा विराट कोहली आणि अखेरच्या क्षणी सामना खेचून आणण्याची क्षमता असणारा धोनी क्षेत्ररक्षणावर नियंत्रण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यष्टीमागे दिसणारा धोनी आणि स्लीपमध्ये असलेला कोहली यांच्यातील कमालीचं साम्य कॅमेऱ्यात कैद झाले.

या फोटोची तुलना करत नेटिझन्स थेट दोघांच्या विचारात साम्य असल्याचा अंदाज लावत आहेत. भारतीय संघ एक नव्हे तर दोन कर्णधारांसह मैदानात उतरत असल्याच्या भावना नेटिझन्सच्या मनात या फोटोनं निर्माण केली आहे.कर्णधारपद सोडल्यानंतरही बऱ्याचदा मैदानावर योग्य निर्णय घेण्यासाठी धोनी नव्या कर्णधाराची मदत करताना दिसला. तर दुसरीकडे धोनी नेहमीच आमचा कर्णधार राहिलं, असे सांगत विराटने आपल्यातील मोठेपणा दाखवून दिला. मात्र फोटोतील दोघांच्यातील समानता ही नेटिझन्सला चांगलीच भावली आहे.