विराट कोहली कॅप्टन बनण्याआधीपासूनच संपूर्ण देशाचा हीरो आहे. त्याने भारतीय टीमकडून पदार्पण केल्याकेल्याच त्याचीच चर्चा व्हायला लागली होती. त्याची आक्रमक शैली, गुड लूक्स आणि आक्रमक पण शिस्तशीर बॅटिंग याची चर्चा सगळीकडे आधीपासून होती. सभ्य लोकांचा खेळ म्हणवल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये आपल्या वेगळ्या अंदाजात आक्रमकपणा आणणाऱ्या खेळाडूंमध्ये विराटचं नाव हटकून घेतलं जातं. तो आता भारतीय टीमचा कॅप्टन झाल्यानंतर तर त्याच्यावर सगळा प्रकाशझोत केंद्रित झालाय.

पण नेहमी होतं तसंच सगळेजण त्याच्या यशाकडे कौतुकाच्या आणि हेव्याच्या नजरेने पाहत असताना त्याने इथवर येण्यासाठी केलेली जीवतोड मेहनत सोयीस्करपणे विसरली जाते. एकेकाळी बटर चिकन, काठी रोल्स आणि मटण रोल्स जबरदस्त ताव मारणाऱ्या विराटने त्याचं क्रिकेटमधलं करिअर सुरू झाल्यावर आपल्या आहाराकडे कटाक्षाने लक्ष दिलं. एकेकाळी प्लेटच्या प्लेट साफ करणारा विराट संतुलित आहार घेऊ लागला. प्रोटीन्सचं योग्य प्रमाण ठेवतानाच त्याने बॅलन्स्ड डाएट केला

”विराटचा माईंडसेट प्रचंड शिस्तशीर आहे”त्याचे लहानपणापासूनचे कोच राजकुमार शर्मा म्हणाले “एखादी गोष्ट ठरवल्यावर तो एकाग्रपणे त्या गोष्टीच्या मागे लागतो. आहाराच्या बाबतीतही त्याने तेच केलं

राजकुमार शर्मांच्या घरी जेव्हा विराट येतो तेव्हा तो पॅकेज्ड ज्यूसही पीत नाही. त्याला नेहमी ताज्या फळांचा रस लागतो. आपल्या आहारातून त्याने कार्बोहायड्रेट्स बाद केले आहेत. प्रत्येकाला वेगवेगळा आहार मानवतो तसा त्याने डाॅक्टरांच्या सल्ल्याने आपला डाएट प्लॅन बनवलाय. आणि आपल्या डाएट प्लॅनपासून तो एकदाही दूर जात नाही. बटरमध्ये डबडबलेल्या चिकनच्या प्लेटच्या प्लेट फस्त करण्याचे त्याचे दिवस आता मागे पडलेत.

त्याच्या या डेडिकेशनचं राजकुमार शर्मांना कौतुक वाटतं. एखादी गोष्ट थोडे दिवस करून सोडून देणं सोपं आहे. पण दीर्घकाळ त्या गोष्टीच्या मागे लागत ती अचिव्ह करणं यातच खरं यश आहे. विराटमध्ये ही चिकाटी पुरेपूर भरली असल्याचं त्याचे कोच सांगतात. तो कुठेही असला, कुठल्याही दौऱ्यावर असला तरी नियमित जिममध्ये जाणं तो टाळत नाही.

त्याच्या याच मेहनतीचं फळ आताचं झालेल्या भारत-इंग्लंड मॅचमध्ये दिसला. एका बाजूला केदार जाधवची फटकेबाजी सुरू असताना दुसऱ्या बाजूला विराटने सिंगल, डबल रन्स काढत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. आपल्या फटकेबाजीने मॅच गाजवणाऱ्या केदार जाधवचीही विराटबरोबर धावताना दमछाक झाली.