ट्वेन्टी-२० विश्वचषकात धावांची टांकसाळ उघडणारा भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ विराट कोहली आणि भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहेत. विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे गेल्यानंतरही भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक दुसऱ्यांदा पटकावण्याची किमया करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. १२५ गुणांसह वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या एका गुणाने भारतीय संघामागे आहे. न्यूझीलंडच्या संघाने तिसरे स्थान कायम राखले आहे. अंतिम फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या इंग्लंडच्या संघाने चौथे स्थान मिळवले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने दमदार प्रदर्शनासह अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच दुसऱ्या स्थानी आहे. विश्वचषकात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या इंग्लंडच्या जो रूटने कारकीर्दीत पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० क्रमवारीत अव्वल पाचमध्ये झेप घेतली आहे. रूट चौथ्या स्थानी आहे. अंतिम लढतीतील सामनावीर मार्लन सॅम्युअल्सने १८व्या स्थानी आगेकूच केली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराहने सातव्या तर आशिष नेहराने ११व्या स्थानी आगेकूच केली आहे. वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सॅम्युअल बद्री अव्वल स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा निवृत्त झालेला शेन वॉटसन अव्वल स्थानी असून, शकीब अल हसन दुसऱ्या स्थानी आहे.