विराट कोहलीने पुण्यामधील गहुंजे मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये शतकी खेळी खेळली. १०८ बॉलमध्ये १२२ धावा काढून आपले २७ वे शतक साजरे केले. या खेळात विराटने अनेक चेंडू सीमेपार पाठवले. परंतु विराटने एक असा षटकार खेचला त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. इतकेच नव्हे तर विराटच्या या षटकारामुळे समालोचकही चकित झाले. रविवारी पुण्यात झालेल्या सामन्यामध्ये इंग्लंडविरुद्ध मारलेला हा षटकार सोशल मिडियावर अनेक वेळा शेअर झाला आहे. विराटने मारलेला हा षटकार त्याची या खेळावर किती मजबूत पकड आहे ते दर्शवतो. त्याने मारलेल्या षटकारात एक संतुलन आणि नैसर्गिक सौंदर्य आहे.

 

विराट कोहली केवळ तडाखेबाज फलंदाज नाही तर तो एक तंत्रशुद्ध फलंदाज असल्याचे या फटक्यावरुन कळते. ख्रिस वोक्स डावातील ३३ वी ओव्हर टाकत होता. विराट कोहलीला चकविण्यासाठी त्याने मुद्दामहून एक अखूड टप्प्याचा आणि किंचित मंद गतीचा बॉल टाकला. हा बॉल खेळताना विराट बॅकफूटवर आला आणि त्याने आपल्या हाताचे कोपर अगदी थोडासे उंच करुन मिड विकेटवर षटकार लगावला. त्याचे हे कौशल्य पाहून सारेच जण अवाक झाले. गेल्या कित्येक दिवसांमध्ये आपण असा सुंदर शॉट बघितला नाही असे समालोचकाने म्हटले. इतकेच नव्हे तर शॉर्ट लेंग्थ असणाऱ्या बॉलला जर अशा पद्धतीने षटकार मारला तर गोलंदाजाचे मनोधैर्य पूर्णपणे ढासळू शकते असे समालोचकाने म्हटले.

हा शॉट बीसीसीआयने आपल्या वेबसाइटवर टाकला आहे. सोशल मिडियावर अनेक वेळा हा शॉट शेअर केला जात आहे. कालच्या खेळातील काही महत्त्वपूर्ण क्लिपमध्ये हा शॉट ट्रेंड होताना दिसत आहे. या शॉटमुळे सर व्हिव्हियन रिचर्ड, सचिन तेंडूलकरच्या शॉटच्या आठवणी जागा झाल्याचे अनेकांनी म्हटले आहे. कालच्या सामन्यातील केदार जाधवची तुफानी शतकी खेळी, महेंद्र सिंह धोनी याने कर्णधार विराटच्या आधी घेतलेला रिव्ह्यूचा निर्णय आणि १२ चेंडूमध्ये जिंकण्यासाठी १ धाव आवश्यक असताना अश्विनने खेचलेला विजयी षटकार यांची देखील सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे. काल कर्णधार म्हणून विराट कोहलीने आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला आहे. कर्णधार म्हणून खेळलेल्या पहिल्याच सामन्यात विराटने शतक मारले आहे. तसेच वर्षातील पहिल्याच सामन्यात शतक मारुन आपण खऱ्या अर्थाने कर्णधार आहोत असे त्याने सिद्ध केले आहे.