सचिन तेंडुलकर आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्याचे विक्रम नेमके कोण मोडणार यावर अनेक जणं चर्चा करताना आढळतात. भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीचा खेळ पाहता अनेकांनी विराट सचिनचे विक्रम मोडीत काढू शकतो असं भाकीत वर्तवलं होतं. आता वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही विराट सचिनचे विक्रम मोडू शकेल असं म्हणत विराटच्या फलंदाजीचं कौतुक केलं आहे.

”गेली अनेक वर्ष मी विराट कोहलीला मैदानात खेळताना बघतो आहे. जसा जसा त्याला अनुभव मिळत जाईल तसं त्याच्या बॅटमधून धावा निघत जातील. आगामी काळत तो जागतिक क्रिकेटमध्ये एक उच्च दर्जाचा क्रिकेटपटू बनू शकेल, कदाचीत सचिन तेंडुलकरचे विक्रमही विराट कोहली आपल्या कारकिर्दीत मोडू शकतो”, असं म्हणतं गेलने कोहलीच्या खेळाचं तोंडभरुन कौतुक केलंय.

विराट आणि गेल आयपीएलमध्ये रॉयल चँलेजर्स बेंगलोर या संघाकडून एकत्र खेळतात. त्यामुळे गेलने विराटची फलंदाजी जवळून बघितलेली आहे. याव्यतिरीक्त आगामी विश्वचषकात खेळण्याबद्दल विचारलं असता गेलने आपला होकार दर्शवला आहे. आगामी विश्वचषकात खेळण्यासाठी मी उत्सुक असून वेस्ट इंडिजला विश्वचषक मिळवून देण्यात मी पुरेपूर प्रयत्न करीन असंही गेलने म्हणलंय.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डासोबत संघातील सिनीयर खेळाडूंचे सुरु असलेले वाद आता संपलेले आहेत. ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड हे खेळाडू आता विंडिजच्या संघात पुनरागमन करणार आहेत.

विराट कोहली टीम इंडिया आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ टी-२० सामना खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात विराट कोहली आणि भारतीय संघ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.